

Maharashtra Politics : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित 'संविधान बचाव जनसभे'च्या निमित्ताने हा वादा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, पक्षातील नाराजीचा सूर आता थेट दिल्लीच्या दारात पोहोचला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जगताप आणि नसीम खान हे दोघेही दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. पक्षश्रेष्ठींसोबत त्यांची एका दुसऱ्या विषयावर बैठक नियोजित असली तरी याच दौऱ्यात ते मुंबई काँग्रेसमधील कारभाराविषयी आणि आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याविषयी तक्रार करणार असल्याचे समजते.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.१३) मुंबईत 'संविधान बचाव जनसभे'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि लोकप्रिय शायर इमरान प्रतापगडी यांनी प्रमुख वक्ते म्हणून संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी केवळ संविधान रक्षणाचा नारा दिला नाही, तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहनही केले. या सभेला आमदार अस्लम शेख आणि आमदार अमीन पटेल यांची उपस्थिती लक्षणीय होती. मात्र, या कार्यक्रमापेक्षा अधिक चर्चा झाली ती पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितीची. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते भाई जगताप व नसीम खान यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासूनच हे दोन्ही नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाई जगताप आणि नसीम खान हे दोघेही दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. पक्षश्रेष्ठींसोबत त्यांची एका दुसऱ्या विषयावर बैठक नियोजित असली तरी याच दौऱ्यात ते मुंबई काँग्रेसमधील कारभाराविषयी आणि आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याविषयी तक्रार करणार असल्याचे समजते. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील मुंबई काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप यापूर्वीही झाला होता, आता तोच सूर दिल्लीत थेट हायकमांडसमोर मांडला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकीकडे काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसत असताना, दुसरीकडे मुंबईतील ही गटबाजी पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईत मिळालेल्या यशाचे श्रेय एकजुटीला दिले जात असताना, आता पुन्हा एकदा सुरू झालेला हा संघर्ष पक्षाच्या भवितव्यासाठी चिंताजनक मानला जात आहे. आता पक्षश्रेष्ठी मुंबई काँग्रेसमधील हा वाद शमवण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.