

Karnataka Congress conflict
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्त्व बदलाच्या नाट्यावर अखेर मंगळवारी (१ जुलै) पडदा पडला. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्याच राहतील, असे काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. यानंतर मात्र कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी माध्यमांनाच सूचक सवाल करत आपली नाराजी अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, "माझ्याकडे कोणता पर्याय आहे? मला त्यांच्या ( सिद्धरामय्या ) पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल. मला त्यावर कोणताही आक्षेप नाही. पक्षाचे हायकंमाड जे काही सांगतील आणि ते जे काही निर्णय घेतील ते पूर्ण केले जाईल. मला आता काहीही चर्चा करायची नाही. लाखो कार्यकर्ते या पक्षाला पाठिंबा देत आहेत."
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे की, ते पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. या वक्तव्यातून त्यांनी राज्यातील नेतृत्वात मध्यावधी बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "होय, मीच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार. तुम्हाला शंका का आहे?" असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच नेतृत्वबदलाचे दावे फेटाळून लावत भाजप आणि जेडी(एस) काँग्रेस हायकमांड आहेत का?" असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
कर्नाटक विधानसभा निवडणूक मे २०२३ मध्ये झाली. या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. यावेळी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत होते. मात्र अखेर कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पडली. तर डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. तसेच कनार्टक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडेच ठेवण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमधील नेत्तृत्व बदलावर चर्चा सुरु झाली आहे.
वारंवार संयम बाळगण्याचे आवाहन करूनही, काँग्रेसच्या अनेक आमदारांनी जाहीरपणे शिवकुमार यांना पाठिंबा दिला आहे. त्यापैकीच एक असलेले इक्बाल हुसेन यांनी दावा केला आहे की, काँग्रेसच्या १३८ पैकी १०० आमदार उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या पाठीशी आहेत. डी. के. शिवकुमार यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी आग्रही मागणी आपण काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. हायकमांडने नेतृत्वबदलाच्या मागणीकडे लक्ष दिले नाही, तर काँग्रेस "पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही," असा इशाराही हुसेन यांनी दिला आहे.