

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांमध्ये सध्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र सुमारे 25 ते 30 महाविद्यालयांमधील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या हॉलतिकिटेच न मिळाल्याने त्यांना काही पेपरसाठी बसताच आले नाही. विशेष म्हणजे विद्यापीठाने जबाबदारी झटकत महाविद्यालयाकडे बोट दाखवले आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये मंगळवारपासून सुरू असलेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षेसाठी काही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळालेच नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाविद्यालयात धाव घेतली असता महाविद्यालयांकडून विविध कारणे देण्यात आली. तसेच या विद्यार्थ्यांची कागदपत्रे जमा न झाल्याने दंड भरावा लागेल, असे महाविद्यालयांनी सांगितले. मात्र दंड भरूनही हॉल तिकीट न देता विद्यापीठाकडूनच हॉलतिकिटे आली नसल्याचे कारण विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मात्र या गोंधळात या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्राच्या परीक्षेला मुकावे लागले.
याबाबत विद्यार्थ्यांनी गुरुवारी विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात दक्षिण मुंबईतील 2 महाविद्यालयांसह आणखी चार महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह पालकांचा समावेश होता.
विद्यापीठात आम्हाला काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला त्यांनी फोर्ट परिसरातून विद्यानगरी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज भवनात पाठवले. मात्र तिथे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिकांना भेटूनही काहीच समाधान झाले नाही, असे पालकांनी सांगितले.