Urban Flooding India
मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईसह चेन्नई, बंगळुरू ही शहरे पुढील पाच वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत. गेली अनेक वर्षे पावसाळ्यात तसे इशारे मिळत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
2005 मधील मुंबईतील महापुराच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यावेळी दिवसभरात 1 हजार मिलिमीटर पाऊस पडला. अर्धवट नालेसफाई आणि अपेक्षेपेक्षा जास्त पडलेल्या पावसामुळे हाहाकार माजला. लोकल ट्रेन, बसेस या सार्वजनिक वाहतुकीसह खासगी वाहतूक सेवा व्यवस्था ठप्प झाली. शेकडो लोक वाहून गेले.
चेन्नईत 2015मध्ये आलेल्या महापुराने जवळपास 400 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. स्थानिक परिवहन सेवा कोलमडली. टेकपार्कचे तलावांमध्ये रूपांतर झाले. एकूणच मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, त्यानंतर 10 वर्षांनीही पूर परिस्थिती रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.
सिलिकॉन व्हॅली बंगळुरूची महापुराचे शहर (फ्लड सिटी) अशी ओळख झाली आहे. अर्ध्या तासाच्या पावसाने शहर पाण्याखाली जाते. ऑफिसमधून घरी जाणे मुष्किल होऊन जाते. येथे हिरवळीचे प्रमाण 88 टक्के कमी झाले आहे.
दोन्ही बाजूंना खाड्या आणि समुद्र तसेच त्यामध्ये 22 छोट्या-मोठ्या टेकड्या यामुळे मुंबईची भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल आहे. त्यातच मुंबईतील पुनर्प्राप्त केलेल्या जमिनीचा बराचसा भाग समुद्राखाली बांधलेला आहे. दुसरीकडे, शहराचा झपाट्याने विकास होताना अनेक ठिकाणी दलदलीच्या भागात भराव टाकला जातो. हा भरावाचा भाग सखल प्रदेशातच असल्याने तिथे पाणी तुंबते. खारफुटी जंगलांमुळे किनारा सुरक्षित राहतो. खारफुटीचे जंगल समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करते आणि जमिनीवर पाणी पसरू देत नाही. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईला पडलेल्या बेकायदेशीर झोपड्यांच्या आणि काही गगनचुंबी इमारतींच्या विळख्यामुळे खारफुटीची जंगले आणि मिठागरे नष्ट होत चालली आहेत. भूतकाळातून बोध न घेतल्याने भविष्यातही मुंबई शहराला महापुराचा धोका आहे, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
वातावरणातील बदल मान्य आहे. मात्र, अयोग्य नियोजनाचा फटका महापुराच्या संकटाला कारणीभूत आहे. मानवनिर्मित चुका नैसर्गिक आपत्तीला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महापुराचे संकट ओढवू शकते.