

मुंबई: मुंबईत गोकुळ, अमूल आणि मदर डेरीच्या दुधापाठोपाठ आता ब्रेडही महागला आहे. पावाच्या दरात मंगळवारपासून पाच रुपयांची वाढ झाली आहे. प्लास्टिक पॅकेजिंग आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगितले जाते.
दूध, खाद्यतेल, अख्खे किंवा दळलेले मसाले, भाज्या, फळे, बेकरीचे पदार्थ किंवा लहान मुलांसाठीचे अन्न अशा सर्वच खाद्यपदार्थांमधील दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले असतानाच आता रोजच्या सकाळची सुरुवात करणाऱ्या ब्रेडचाही दिलासा उरलेला नाही.
प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवण्यासाठी वापरली जाणारी प्लॅस्टिक पावडर आयात केली जाते आणि ती खूप महागली आहे. परिणामी ब्रेडच्या किमती वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे अंधेरी येथील ब्रेडक्राफ्ट बेकरीचे व्यवस्थापक सुरेश पासवान म्हणाले.
क्वालिटी बेकर्सचे संचालक आणि इंडिया बेकर्स असोसिएशनचे सदस्य सलाहुद्दीन खान यांनी सांगितले की, वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे ब्रेड तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया महागली आहे. शिवाय, प्रिझर्व्हेटिव्हज (अगदी मीठसुद्धा) खूप महागले आहे. पेट्रोलियम उत्पादन असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे.
दरवाढ अखेरचा पर्याय
माहीममधील डेलविनचे मालक, बेकर्स इर्शाद अन्सारी यांनी अलीकडेच दर वाढवले होते. परंतु खर्च वाढतच असल्याने ते पुन्हा चिंतेत आणि दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. वरळीतील सिटी बेकरीचे मेहदी दाश्ती म्हणाले की, दरवाढ हा सर्वात शेवटचा पर्याय असतो. सध्या आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत.
मात्र, गॅस तसेच प्लास्टिक पॅकेजिंग खूप महाग झाले आहे. एखादा खाद्यपदार्थ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यावर खरेदी करावा की नाही, असा प्रश्न लोकांना पडतो. गेल्या गुरुवारी 14 मे रोजी दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढले. त्यानंतर आता मॉडर्न ब्रेड कंपनीने बेसिक प्रकारांच्या पावाच्या दरात प्रति पॅक तब्बल पाच रुपयांची विक्रमी वाढ केली. ब्रिटानिया आणि विब्स देखील अशीच दरवाढ करण्याची शक्यता आहे.
मॉडर्नचा 400 ग्रॅम सँडविच लोफ: 40 वरून 45 रुपये
छोटा ब्राऊन लोफ: 28 वरून 30 रुपये
व्हाईट लोफ: 20 वरून 22 रुपये
ब्राऊन ब्रेड: 45 वरून 50 रुपये
होल व्हीट: 55 वरून 60 रुपये
मल्टीग्रेन: 60 वरून 65 रुपये