

मुंबई : निवडणूक कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात पाचारण केल्याने मुंबईतील महापालिका शाळांमध्ये शनिवारी झालेल्या पॅट परीक्षेदरम्यान पर्यवेक्षणासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिणामी अनेक शाळांमध्ये सफाई कामगार तसेच काही ठिकाणी पालकांच्या हातीच परीक्षा पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपवावी लागल्याचे वास्तव उघड झाले आहे.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) दरवर्षी पॅट परीक्षा आयोजित करते. यंदा 11 व 15 आणि 22 एप्रिल रोजी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, शनिवारी प्रथम भाषेच्या पहिल्या पेपरचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते.
परीक्षेच्या सुरुवातीलाच प्रश्नपत्रिका अपुऱ्या आल्याने अनेक शाळांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच दोन हजारांहून अधिक शिक्षकांना तातडीने निवडणूक कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती कमी होती. त्यामुळे काही शाळांनी सफाई कामगारांना पर्यवेक्षक म्हणून वर्गांवर पाठवले, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची मदत घेण्यात आली, अशी माहिती काही पालकांनी दिली.
या गंभीर प्रकाराबाबत पालिकेच्या शिक्षण विभागाशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
या धक्कादायक प्रकारामुळे पॅट परीक्षेचा मूळ उद्देश धोक्यात आल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे अनेक ठिकाणी पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील पेपरवेळी अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावे, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून होत आहे.