

मुंबई : मुंबई महानगरपालिका शाळांच्या दुरुस्तीवर करोडो रुपयांचा खर्च करत असताना काळाचौकी येथील महापालिका शाळेच्या दुरवस्थेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शाळेची एक ग्रिल कोसळून दुर्घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मुंबई महापालिका प्रशासनाची अब्रु मात्र चव्हाट्यावर आली.
काळाचौकी प्राथमिक शाळेत दुर्घटना घडली तेव्हा घटनास्थळी विद्यार्थी व कर्मचारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली असली तरी महापालिका प्रशासन मात्र याबाबत बेफिकीर असल्याचे दिसून आले आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेची माहिती स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांसह नागरिकांनी दिल्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. झालेल्या दुर्घटनेसह शाळा इमारतीची पाहणी करून, त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला. त्यामुळे आता तरी या शाळेची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांची आहे.
जबाबदारी निश्चित करा!
जुन्या शाळेमध्ये होणाऱ्या पडझडीची जबाबदारी शिक्षण विभागाच्या एखाद्या अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.