

मुंबई: 2003 मधील सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूस यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला सत्र न्यायालयाने झटका दिला. वाझेने दोषमुक्ततेसाठी अर्ज केला असून त्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दोषमुक्ततेच्या अर्जावर उत्तर देण्यास भाग पाडण्यासाठी निर्देश देण्याची विनंती केली होती. ही विनंती सत्र न्यायालयाने फेटाळून लावली.
वाझेने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. याच न्यायालयात वाझेविरोधात ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी खटला सुरु आहे. त्याने 2018 च्या सरकारी परिपत्रकाचा आधार घेत न्यायालयात दाद मागितली होती.
संबंधित परिपत्रकाबरोबरच 2019 च्या पायल तडवी मृत्यू प्रकरणाकडेही वाझेने न्यायालयाचे लक्ष वेधले होते. वाझेच्या याचिकेवर घरत यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. वाझेचे दावे पूर्णपणे खोटे असून केवळ खटला लांबवण्याच्या उद्देशाने वाझे नवनवे अर्ज करीत आहे, असा युक्तिवाद अॅड. प्रदीप घरत यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत सत्र न्यायालयाने सचिन वाझेची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे लवकरात लवकर दोषमुक्त होण्यासाठी धडपड करीत असलेल्या वाझेला सत्र न्यायालयाच्या निर्णयाने झटका बसला.