

मुंबई: स्वच्छतेची एक उपाय योजना म्हणून गुटखा, तंबाखू व पान खाऊन येणाऱ्या रुग्णासह नातेवाईकाला मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत, याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गुटखा तंबाखू व पान खाऊन इमारतीच्या कोपऱ्या कोपऱ्यात थुंकणाऱ्या नागरिकांमुळे निवासी इमारतीसह सरकारी, निमसरकारी कार्यालय, हॉस्पिटल दवाखाने अस्वच्छ दिसून येत आहेत. अशा नागरिकांवर निवासी संकुलांमध्ये दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
पण सरकारी निमसरकारी मुंबई महापालिका कार्यालयासह हॉस्पिटलमध्ये थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होतच नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य स्वच्छता आणि शिस्तीच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण होत आहे.
याची दखल घेत सभागृह नेते गणेश खणकर यांनी मुंबई महानगरपालिका सभागृहात गुटखा तंबाखू व पान खाऊन येणाऱ्या नागरिकांना मुंबई महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालय हॉस्पिटल दवाखान्यांमध्ये बंदी घालण्यात यावी, अशी ठरावाची सूचना सादर केली आहे. या सूचनेची गंभीर दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली आहे.
गुटखा, तंबाखू व पान खाऊन हॉस्पिटलची इमारत अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रवेशच प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
हॉस्पिटलच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमार्फत हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी गुटखा खाल्ला की नाही, याची खात्री करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर त्यांच्या खिशात तंबाखू अथवा गुटखा असल्यास तो जप्त केला जाणार आहे.
नियमावली तयार करणार
हॉस्पिटलसह महापालिका मुख्यालय व विभाग कार्यालयात गुटखा व तंबाखू खाऊन येणाऱ्यांसाठी आरोग्य विभागामार्फत एक नियमावली तयार करण्यात येणार आहे. या नियमानुसार प्रवेश बंदी, दंडात्मक कारवाई, एखादे ठिकाणी थुंकल्यानंतर ते स्वच्छ करून घेणे आदीसह अन्य निर्बंध घालण्यात येणार आहेत.