

मुंबई : उपनगरीय वाहतुकीवरील वाढती गर्दी नियंत्रित करणे रेल्वेसह सरकारसमोरील मोठे आव्हान बनले असून, भारतीय रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल नेटवर्कमध्ये सुधारणा आणण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाजांच्या लोकल गाड्या सुरू करण्याची गरज अधिक प्रकर्षाने समोर आली. आजघडीला मुंबईत मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावर एकूण 3 हजार लोकल फेऱ्या चालविल्या जातात. ज्यातून सुमारे 60 लाखांहून अधिक मुंबईकर प्रवास करतात. एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे प्रवासी सुरक्षित राहतात. यावर उपाय म्हणून स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या दोन साध्या लोकल तयार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
रेल्वेमंत्र्यांचे निवेदन
लोकलमधील वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे मृत्यू यावर मुंबईतील खासदारांनी 3 डिसेंबर रोजी लोकसभेत रेल्वे मंत्र्यांना प्रश्न विचारले होते. खासदार वर्षा गायकवाड आणि खासदार संजय दिना पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर, चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी कारखान्यात ऑटोमॅटिक डोअर-क्लोजर सिस्टम असलेल्या दोन नॉन-एसी लोकल ट्रेन रेकची बांधणी केली जात असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला दिली.
मध्य रेल्वेचा प्रयोग
या नवीन ईएमयू रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे, दोन डब्यांमधील जोडणीसाठी वेस्टिब्युल्स, छतावरील व्हेंटिलेशन युनिट आणि दरवाजांवर हवेच्या वहनासाठी खिडकीचे झडप बसवले जाणार आहेत, अशी माहिती देखील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला दिली. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने कुर्ला कारशेडमध्ये एका रेकला ऑटोमेटिक डोअर लावून त्याच्या चाचण्यादेखील घेण्यात आल्या. त्याची पाहणीदेखील मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केली होती. मात्र, त्याला परवानगी नाकारण्यात आली. मुंबईत सध्या धावणाऱ्या साध्या लोकलना ओटीमेटिक डोअरमध्ये रुपांतरित करणे शक्य नाही. साध्या नवीन लोकल आल्यानंतर लोकल रूपांतरित करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
पुढील पाच वर्षांत येणार नव्या एसी लोकल
दिवाळीत अनौपचारिक गप्पांमध्ये मुंबईकरांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ संयुक्तरित्या 238 नव्या वातानुकूलित लोकल खरेदी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर वातानुकूलित लोकल खरेदीला प्रवासी संघटनांनी विरोधदेखील केला होता. मात्र ही लोकल खरेदी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, पुढील पाच वर्षांत या लोकल येतील, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.