

मुंबई: बीडीडी चाळीत डेंग्यूची पाहणी सुरू होती. कुठे पाणी साचलंय का, डासांची पैदास होऊ शकते का, परिसरात धोका कुठे आहे हे पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागातील कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत असतात.
मात्र शनिवारी महानगरपालिकेच्या एफ. दक्षिण विभागातील कीटकनाशक विभागातील कामगार पांडुरंग तोडकर (वय ४७) यांचा भोईवाडा येथील बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना ५ ते ७ फूट उंचीवरून खाली कोसळून दुर्दैवाने मृत्यू झाला.
पांडुरंग तोडकर टाकी तपासण्यासाठी वाकलेे आणि टाकीतच पाठीवर कोसळले. त्यांच्या डोळ्याला रॉड लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना बाहेर काढून केईएम रूग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तोडकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असून, त्यांचे पितृछत्र हरपले आहे. शुक्रवारीच पालिकेचा एक सफाई कामगार मुलुंडमध्ये बसखाली येऊन ठार झाला आणि पाठोपाठ शनिवारी ही दुर्घटना घडली.