

Financial Fraud Attempt
मुंबई : बोगस स्वाक्षरी करून बँकेतून पाच लाख रुपये काढण्याचा प्रयत्न एका दक्ष बँक कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे फसला आहे. याप्रकरणी एका एनजीओमध्ये शिपाई म्हणून काम करणार्या श्रीकांत शिवशंकर गडतिया यास आंबोली पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत जुहू येथे राहतात. ते एका खासगी कंपनीत अध्यक्ष, एनजीओमध्ये मुख्य संचालक तर मालदिव देशाचे ऑननरी कॉन्सुलेट जनरल म्हणून काम करतात. त्यांची एनजीओ गरीबांसाठी काम करत असून अंधेरीतील विरा देसाई रोडवर एनजीओचे एक कार्यालय आहे. याच कार्यालयात श्रीकांत हा सहा वर्षांपासून शिपाई म्हणून कामाला होता.
बुधवारी सकाळी तो एनजीओचे खाते असलेल्या बँकेत पाच लाख रुपये काढण्यासाठी आला होता. त्याने पाच लाखांचा एक धनादेश बँक कर्मचार्याला दिला. मात्र या कर्मचार्याला संशय आल्याने त्याने तक्रारदारांना कॉल केला.यावेळी त्यांनी कोणालाही पाच लाखांचा धनादेश दिला नसल्याचे सांगितले. धनादेश पाहिल्यानंतर त्यावरील स्वाक्षरी त्यांची नव्हती. त्यामुळे त्यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यावर श्रीकांत गडतिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासात त्याने 3 जून रोजी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून दिड लाख रुपये काढले होते. त्यांच्या विविध बँकेशी संबंधित 55 धनादेशांवर त्याने बोगस स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. चौकशीअंती श्रीकांतची भाची आजारी असून तिच्या ऑपरेशनसाठी त्याने बोगस स्वाक्षरी करुन दिड लाखांचा अपहार केला होता. दुसर्या दिवशी तो पुन्हा बँकेत आला आणि त्याने पाच लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बँक कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला.
याप्रकरणी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या 9 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहे.