

मुंबई : मुंबईत राज्य सरकारच्या वतीने ‘आशा भोसले संगीत ॲकॅडमी’ स्थापन करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर मोहोर उमटवण्यात आली. वांद्रे ते अंधेरी दरम्यान यासाठी म्हाडाला जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आशा भोसले यांनी आपल्या हयातीत राज्य सरकारकडे मुंबईत एका जागतिक दर्जाच्या संगीत ॲकॅडमीसाठी मागणी केली होती. वांद्रे आणि अंधेरी दरम्यानच्या परिसरात यासाठी जागा मिळावी, अशी त्यांची आग्रही विनंती होती. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. केवळ पारंपरिक स्मारक उभारण्यापेक्षा आशाताईंनी स्वतः दिलेला संगीत ॲकॅडमीचा प्रस्ताव पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी ही ॲकॅडमी मैलाचा दगड ठरेल. वांद्रे ते अंधेरी या पट्ट्यात शासकीय भूखंड उपलब्ध करून देऊन तिथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ही वास्तू उभारली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखविला.