

मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना सावध करणारी गंभीर घटना घडली आहे. विमानतळाच्या अधिकृत ईमेल आयडीवर अज्ञात व्यक्तीकडून एक धमकीचा मेल प्राप्त झाला असून त्यात परदेशात जाणाऱ्या चार महत्त्वाच्या उड्डाणांना उडवून देण्याचा दावा करण्यात आला आहे. या मेलमुळे पोलिस आणि विमानतळ प्रशासन अधिक सतर्क झाले असून सर्व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.
धमकीच्या मेलमध्ये अतिशय गंभीर मजकूर लिहिला आहे. मेल पाठवणाऱ्याने दावा केला आहे की “जपान, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या विमानांमध्ये स्फोटकं आधीच ठेवली आहेत. विमानांनी उड्डाण केल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने ती सलग फुटतील.” एवढ्यावरच न थांबता, पुढे मेलमध्ये लिहिले आहे. “जर अशा दुर्घटनेपासून वाचायचं असेल तर दहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (१० million USD) तयार ठेवा.”
या मेलमध्ये दिलेली धमकी केवळ भीती निर्माण करणारी नाही, तर उड्डाण करणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकासह (ATS), सायबर विभाग आणि विमानतळ सुरक्षा दलाने एकत्रित तपास सुरू केला आहे.
सध्या त्या ईमेलचा स्त्रोत, आयपी अॅड्रेस, मेल पाठवण्यासाठी वापरलेले माध्यम आणि संबधित तांत्रिक पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. विमानतळावरील सर्व टर्मिनल्समध्ये सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही अतिरिक्त तपासणीनंतरच सोडली जात आहेत.
या प्रकरणाला दहशतवादी हेतू आहे का, की कोणीतरी आर्थिक खंडणीसाठी घातपातासारखी धमकी देत आहे, याबाबत पोलिस विविध कोनातून तपास करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळ परिसर, बॅगेज स्कॅनिंग व्यवस्था, तसेच विमानांची तांत्रिक तपासणी अधिक काटेकोर करण्यात आली आहे.