

मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून मुंबईतील विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीनचा पहिला कटरहेड यशस्वीरित्या खाली उतरवण्यात आला. 13.6 मीटर व्यास आणि तब्बल 350 टन वजन असलेला हा भाग टीबीएमच्या मुख्य शिल्डच्या प्राथमिक जुळणीमधील अंतिम टप्पा मानला जातो.
सध्या 3 हजार टनांहून अधिक वजनाच्या दोन टीबीएम मशीनची जोडणी सुरू असून त्या मुंबईतील 21 किमी लांबीच्या बोगद्यांपैकी 16 किमी भागाचे काम करणार आहेत. यामध्ये ठाणे खाडीखालून जाणारा 7 किमी लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदाही समाविष्ट आहे. रेल्वे बोगदा बांधकामासाठी देशात प्रथमच एवढ्या मोठ्या टीबीएम मशीनचा वापर केला जात आहे.
13.6 मीटर व्यासाचा हा कटरहेड हाय-स्पीड रेल्वेच्या अप आणि डाउन दोन्ही लाईन्ससाठी एकाच मोठ्या बोगद्याचे खोदकाम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. 350 टन वजन म्हणजे साधारणपणे 250 मध्यम आकाराच्या एसयूव्ही गाड्यांच्या वजनाइतके पाच वेगवेगळ्या भागांमध्ये आणलेल्या या युनिटला साइटवर 1 हजार 600 किलो उच्च-प्रिसिजन वेल्डिंगच्या मदतीने जोडण्यात आले. या युनिटमध्ये 84 कटिंग डिस्क, 124 स्क्रेपर्स आणि 16 बकेट लिप्स बसवण्यात आले आहेत, जे खोदकामादरम्यान माती आणि दगड प्रभावीपणे कापून बाहेर काढण्याचे काम करतात.
कटिंग डिस्क हे मुख्य साधन असून ते खडक कापण्याचे काम करतात. त्यानंतर कटरहेडवर बसवलेले स्क्रेपर्स माती आणि दगड साफ करण्याचे काम करतात. बकेट लिप म्हणजे कटरहेडमधील ते उघडे भाग ज्यातून माती आणि दगड मशीनच्या मक्क चेंबरमध्ये प्रवेश करतात.
यामुळे मलबा गोळा करून तो पाइपलाइन प्रणालीद्वारे बोगद्याबाहेर काढला जातो. ही टीबीएम विक्रोळीहून सुमारे 6 किमीचा प्रवास सुरू करून दाट शहरी भाग आणि मिठी नदीखालून जात वांद्रे-कुर्ला संकुल येथील बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचेल.