

मुंबई : दहा हजारांची लाचेची रक्कम घेताना महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. योगेश रमाकांत सावंत आणि सुशांत चंद्रकांत गमरे अशी या दोघांची नावे आहेत.
दोघेही के/साऊथ मनपामध्ये अनुक्रमे प्रभारी सहायक मुख्य पर्यवेक्षक, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कामगार म्हणून कार्यरत होते. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार मनपा कर्मचारी असून के/साऊथ वॉर्डमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांची कायमस्वरुपी सफाई कामगार म्हणून नेमणुकीसाठी एक पत्र दिले होते. त्यासाठी त्यांच्याकडे योगेश सावंत यांनी पंधरा हजारांची लाचेची मागणी केली होती.
ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 5 मे रोजी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. शहानिशा केल्यानंतर योगेश सावंत यांनी त्यांच्या कामासाठी पंधरा हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पंधरा हजारांची रक्कम घेऊन त्यांना भेटण्यासाठी गेले असता लाचेचा पहिला दहा हजारांचा हप्ता सुशांत गमरे यांना दिला आणि गमरे महाशय सापळ्यात अडकले.
ही रक्कम त्याने सुशांत सावंत यांच्या वतीने घेतली होती. त्यामुळे या गुन्ह्यांत सावंत यांनाही अटक झाली. विशेष सत्र न्यायालयाने दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.