

पुढारी ऑनलाईन डेस्क
मुंबईत आणखी एक हिट अँड रनचा (Aarey Colony Hit And Run) थरार घडलाय. गोरेगावच्या आरे परिसरात गुरुवारी एका अल्पवयीन मुलाने चालविलेल्या भरधाव SUVने एका दुचाकीला उडवले. यात २४ वर्षीय दूध पुरवठा करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना आरे कॉलनीत पहाटे चारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या बाजूने आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने दूध पुरवठा करणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात नवीन वैष्णव यांचा मृत्यू झाला. या घटनेतील एसयूव्ही चालक १७ वर्षांचा असून एसयूव्हीचे मालक इक्बाल जिवानी (४८) आणि त्याचा मुलगा मोहम्मद फज इक्बाल जिवानी (२१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दुचाकीला धडक देऊन एसयूव्ही कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. यानंतर अल्पवयीन चालकाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो जखमी झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
तो दारुच्या नशेत होता की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या हिट अँड रन घटनेपूर्वी संशयित आरोपीने मित्रांसोबत पार्टी केली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.