मुंबई : ड्रग्ज माफिया क्विन शकुंतला उर्फ बेबी पाटणकर विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : ड्रग्ज माफिया क्विन शकुंतला उर्फ बेबी पाटणकर विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वरळीतील ड्रग्ज माफिया क्विन म्हणून नावजलेल्या शकुंतला उर्फ बेबी पाटणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी तिने एका व्यावसायिकाला स्वतात सोने देण्याचे आमिष दाखवून एक कोटी ९७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी बेबी पाटणकर हिच्यासह परशुराम मुंडे नावाच्या व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२३ या दरम्यान हा गुन्हा घडला आहे. यातील आरोपी बेबी पाटणकर आणि तिचा साथिदार मुंडे यांनी कफ परेडमधील व्यावसायिक आणि रुचिना फ्रेंच फाॅरवर्ड या कस्टम क्लिअरन्स सर्व्हिस देणाऱ्या कंपनीचे मालक किरीट चाैहान (६१) यांना स्वतात सोने देण्याचे आमीष दाखवले. आमिषाला बळी पडलेल्या चाैहान यांना पाच किलो सोने देतो असे सांगून त्यांच्याकडून या दोघांनी रोख स्वरुपात ७० लाख रुपये आणि एक कोटी २७ लाख ५८ हजार २२९ रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून स्विकारुन सोने न देता पळ काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हेशाखा अधिक तपास करत आहे.

कशी केली फसवणूक..

चाैहान यांनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी याबाबत काही व्यावसायिक मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना सांगितले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये देवकुमार रॉय नावाच्या व्यक्तीने त्यांची सुनीता चौधरी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. चौधरी यांनी परशुराम मुंढे नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. मुंढे याने तो पुण्यातील आरआरएम गोल्ड ट्रेडिंग कंपनीचा संचालक असून त्यांची कंपनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते असे सांगितले.

कस्टममध्ये पकडलेले सोने लिलावात कमी भावात खरेदी करुन बाजार भावापेक्षा कमी भावात देतो असे सांगून त्याने चाैहान यांना वरळी नाक्याजवळील भिवंडीवाला चाळीतील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत सोने दाखवण्यासाठी नेले. येथे बेबी पाटणकर बसली होती. चाैहान यांच्याशी बेबीची ओळख करुन दिली. बेबीने तिच्याजवळील एक किलो वजानाचे सोन्याचे पाच बार आणि १०० ग्रॅम वजनाची सोन्याची १५ बिस्किटे असे एकूण सहा किलो ५०० ग्रॅम सोने तिने दाखवले.

सोने पाहून चाैहान तेथून बाहेर पडले. त्यांनी सोने खरेदीला होकार दिला. चाैहान यांनी त्यांना रोख आणि आरटीजीएसच्या माध्यामातून १.९७ कोटी रुपये पोच केले. बेबी सोने घेऊन येते असे सांगून पैसे घेऊन तेथून निघून गेली. बराचवेळ वाट बघून ती न आल्याने चाैहान यांनी तिला काॅल केला. तिने झवेरी बाजार येथे भेटून सोने नेण्यास सांगितले. चाैहान हे झवेरी बाजार येथे पोहचले. पण बेबी सोने घेऊन आलीच नाही. पूढे, बेबीची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगून चाैहान याना घाबरविण्यात आले. सोनेही मिळाले नाही आणि पैसेही गेल्याने अखेर चाैहान यांनी पोलिसांत धाव घेत फसवणूकीची तक्रार दिली आहे.

कथित ड्रग्ज प्रकरणाने बेबी होती चर्चेत…

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार धर्मराज काळोखे याच्या साताऱ्यातील घरावर ९ मार्च २०१५ मध्ये छापेमारी करुन पोलिसांनी कथित एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणात बेबी पाटणकरचा सहभाग समोर आला. मात्र तीने सव्वा महिना पोलिसांना गुंगारा दिला. बेबी पाटणकर हिच्यासह मुंबई पोलीस दलातील अंमली पदार्थ कक्षाच्या एका तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकासह सहा पोलिसांना याप्रकरणात अटक झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या उपायुक्तांसह, अप्पर पोलीस आयुक्तांवर संशयाची सुई गेली होती. मात्र तपासामध्ये पोलिसांनी जप्त केलेला माल हा एमडी ड्रग्ज नसून अजिनोमोटो असल्याचे समोर आले होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news