

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये एकूण मंजूर पदांपैकी सुमारे 45 टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. जन स्वास्थ्य अभियानाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहायक, लॅब आणि एक्स-रे तंत्रज्ञ, परिचारिका, वॉर्ड बॉय तसेच स्वच्छता कर्मचारी अशा सर्वच स्तरांवर मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. यामुळे तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया आणि दैनंदिन सेवा यांचा वेग मंदावला आहे.
या तीनही रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज बारा हजारांहून अधिक रुग्ण येतात, त्यापैकी पाचशे ते सहाशे रुग्णांना दररोज दाखल करावे लागते. केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा सहायकांची सर्व पदे रिक्त आहेत. सायन रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकांची संख्या अत्यल्प असून नायर रुग्णालयातही विविध विभागांत मोठी पोकळी आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका गरीब आणि गरजू रुग्णांना बसत असल्याचे चित्र आहे.
स्थायी भरती करण्याऐवजी ठेक्यांवर भर देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू आहे, असे मत जन स्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण धोरणातील बदलांमुळे प्राध्यापका भरतीला विलंब झाला असून लवकरच नियुक्त्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालक डॉ. नीलम अंदाडे यांनी दिली आहे.
सायन रुग्णालयातील रिक्त पदे
सायन रुग्णालयात 99 मंजूर प्राध्यापक पदांपैकी 54 पदे रिक्त आहेत. 138 सहयोगी प्राध्यापक पदांपैकी 40 पदे रिक्त आहेत. 225 सहाय्यक प्राध्यापक पदांपैकी 153 पदे रिक्त आहेत. सर्व 23 प्रयोगशाळा सहाय्यक पदे रिक्त आहेत. 71 प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांपैकी दहा पदे, 44 एक्स-रे तंत्रज्ञ पदांपैकी 19 पदे रिक्त आहेत. शिवाय, 44 औषध वितरक पदांपैकी 23 पदे रिक्त आहेत.
नायरमधील रिक्त पदे
नायर रुग्णालयात, प्राध्यापकांच्या 78 पैकी 31 पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या 115 पैकी 29 पदे रिक्त आहेत आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या 184 पैकी 132 पदे रिक्त आहेत. लॅब टेक्निशियनच्या 66 पैकी 30 पदे, एक्स-रे टेक्निशियनच्या 45 पैकी 28 पदे आणि परिचारिकांच्या 99 पैकी 27 पदे रिक्त आहेत.
केईएममध्ये प्रयोगशाळा सहायकांची सर्व पदे रिक्त
केईएम रुग्णालयातील प्राध्यापकांच्या 106 मंजूर पदांपैकी 40 रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या 168 पदांपैकी 50 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहायकांच्या 33 पैकी सर्व पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या 27 पैकी 10 पदे रिक्त आहेत. सहायक तंत्रज्ञांच्या 72पैकी 61 पदे रिक्त आहेत. एक्स-रे तंत्रज्ञांच्या 52 पैकी 30 पदे रिक्त असून परिचारिकांची 13 पदे रिक्त आहेत.