

मुंबई : अमली पदार्थ विरोधी कक्षाने राज्यभरात धाडी टाकत एमडी ड्रग्जचे कारखाने उद्वस्थ करीत ही साखळी तोडली आहे. मात्र विदेशातून आता तस्करी वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात जप्त केलेल्या पंधरा कोटींच्या कोकनप्रकरणी तीन आरोपींना डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. तर एका विदेशी महिलेला 17 कोटींच्या कोकेनसह आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत 1 कोटी 16 लाख 19 हजार रुपयांचा हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
डोंगरीतील सबीना गेस्ट हाऊसमध्ये एक तरुण वास्तव्यास असून त्याच्याकडे कोट्यवधींचेे कोकेन असून तो डोंगरी परिसरात आल्याची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे छापा टाकला होता. यावेळी सबीना गेस्ट हाऊसच्या एका रुममधून पोलिसांनी तीन किलो कोकेन जप्त केले होते.
आरोपी तरुण कपूर हा पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसाकडून शोध सुरू होता. आरोपी कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो हिमाचल प्रदेशचा रहिवाशी असून त्याच्यासह साहिल आणि हिमांशू या दोघांनी इथियोपिया या आफ्रिकन देशातून ते कोकेन आणले होते. कोकेन ताब्यात घेतल्यांनतर एक मुंबईत तर इतर दोघेही चेन्नईला गेले होते.
चेन्नईत असताना साहिल आणि हिमांशू या दोघांना चेन्नई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. यावेळी त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांनी पाच किलो कोकेनचा साठा जप्त केला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत पंचवीस कोटी रुपये इतकी होती.
याच गुन्ह्यांत ते दोघेही चेन्नईच्या पुडल कारागृहात होते. तपासात ही माहिती उघड होताच या दोघांचाडोंगरी पोलिसांनी प्रोडेक्शन वॉरंट सादर करुन ताबा घेतला होता. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
17 कोटींच्या कोकेनसह विदेशी महिलेस अटक
कोकेन तस्करीप्रकरणी एका विदेशी महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तिच्याकडून या 17 कोटी 18 लाख रुपयांचे 1 किलो 718 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे.
युगांडातील एन्टेबे येथून आलेल्या या महिलेच्या सामानाची तपासणी केल्यानंतर खाऊच्या पाकिटात लपवून आणलेले कोकेन सापडले. अटक महिला ही टांझानिया देशाची नागरिक असून तिला कोकेन तस्करीसाठी काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती.
अमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेने मुंबईत तस्करांच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात धाडी टाकून करोडोंचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबईतील कुख्यात तस्कर रोमा आरिफ शेख उर्फ पगली (37) हिला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.