

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर 1 लाख 68 हजार 350 मतदार दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त यादीनुसार सुरुवातीला 11 लाख 1 हजार 507 दुबार मतदारांची नोंद होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत केलेल्या सखोल तपासणीत 9 लाख 33 हजार 157 मतदार दुबार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुबार मतदारांची मोठी आकडेवारी पारंपरिक मॅन्युअल पद्धतीने तपासली असती, तर किमान तीन ते चार महिने लागले असते. मात्र, महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तसेच एफ उत्तर व एन विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या प्रायोगिक उपाययोजनांमुळे दुबार मतदार शोधण्याचे डेस्क वर्क अवघ्या तीन ते चार तासांत पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेले वापरण्यात आले.
या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने वापरून एकाच वॉर्डमध्ये दोन किंवा अधिक वेळा नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी, तसेच एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. या प्राथमिक छाननीनुसार, एकाच वॉर्डमधील दुबार नावे 2 लाख 25 हजार 572, तर एकापेक्षा अधिक वॉर्डमधील नावे 8 लाख 75 हजार 935 इतकी होती. यानंतर प्रत्येक वॉर्डनिहाय सखोल पडताळणी करण्यात आली.
या तपासणीनंतर दुबार मतदार निश्चित करण्यात आले असून, त्यांच्याबाबत गृहभेटी घेऊन प्रत्यक्ष पडताळणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
दुबार मतदार शोधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या या तंत्रज्ञानाधारित मॉडेलचे राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे. तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यांसह अनेक महानगरपालिकांनी या सॉफ्टवेअरची व कार्यपद्धतीची माहिती मागवली असून, पालिकेचा हा उपक्रम राज्यातील इतर महानगरपालिकांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
फक्त 15 टक्के दुबार मतदार
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट 126,616 घरांना भेट देऊन पडताळणी केली. यापैकी 48,328 मतदारांनी फॉर्म अ सादर केला. या फॉर्ममध्ये, दुबार मतदारांनी एकाच प्रभागात मतदान करण्याची इच्छा दर्शविली. राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या यादीत फक्त 15 टक्के दुबार मतदार आढळल्याचे पालिकेने नोंदवले आहे. एकूण दुबार मतदारांच्या 100 टक्के पडताळणी करण्यात आली आहे. एल वॉर्ड, के पश्चिम आणि आर.मध्य वॉर्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार आढळले.
दुबारांच्या नावापुढे स्टार
मुंबईतील एका वॉर्डमध्ये तीन ते चार वेळा डबल मतदारांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यामुळे, जे डबल मतदार नाहीत त्यांच्या नावांपुढील डबल स्टार काढून टाकले जातील. जे प्रत्यक्षात दुबार मतदार आहेत त्यांच्या नावापुढील डबल स्टार कायम ठेवले जाणार आहेत. मतदान करताना त्यांच्याकडून एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्याचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.