

MPSC Secretary Mahendra Harpalkar Transfer: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदावर कार्यरत असलेले महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गेल्या काही काळापासून आयोगाच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरु होतं. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पुण्यात 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
या चर्चेदरम्यान MPSC सचिवांची बदली करण्याबाबत विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आता सरकारकडून प्रत्यक्ष शासन निर्णय काढण्यात आल्याने या मागणीवर कार्यवाही झाली आहे.
महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता प्रशासकीय कारणास्तव त्यांची या पदावरील प्रतिनियुक्ती समाप्त करण्यात आली आहे.
हरपाळकर यांना पुढील पदस्थापना कुठे दिली जाणार, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा कार्यभार त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे तातडीने सोपवावा, असेही सरकारने निर्देश दिले आहेत.
MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या कामकाजासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही होती.
मात्र अध्यक्षांचा राजीनामा घेण्याबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आले नाही. त्याऐवजी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.
MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाची तयारी केली होती. त्याआधीच मुख्यमंत्री आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली. या चर्चेत देण्यात आलेल्या आश्वासनानंतर आता शासन निर्णय जारी झाला आहे. आता हरपाळकर यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.