

नवी मुंबई: एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सचिवांना भेटायला आल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ३ ऑगस्ट रोजी झालेल्या एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी धरणे आंदोलनामध्ये कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता आणि यानंतर आता थेट सचिवांच्या तोंडाला काळे फासले.
याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संभाजी ब्रिगेडच्या सावंत, राणेंसह आणखी एक अशा तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
नवी मुंबईच्या एमपीएससी कार्यालयात ही घटना घडली. संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांनी गुरुवारी सचिवांची भेट घेऊन काही पुरावे द्यायचे आहेत, असे सांगून शुक्रवारच्या भेटीची वेळ मागितली होती.
त्यानुसार ते कार्यालयात आले. काही पुरावे मोबाईल फोनमध्ये असल्याने त्यांनी एक फोन वर घेऊन जाण्याची परवानगी मागितली. दोन जण सचिवांकडे भेटवस्तू आणि पुरावे दाखवण्याच्या बहाण्याने गेले आणि तिथे त्यांनी त्यांच्या अंगावर काळी भुकटी टाकली. यावेळी तिसरी व्यक्ती या संपूर्ण घटनेचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता. या तिघांनाही जागीच ताब्यात घेण्यात आले.
एमपीएससी कार्यालयात आधीपासूनच पोलीस बंदोबस्त आहे. गरज भासल्यास अवघ्या एका मिनिटात तत्काळ पोलीस मदत मिळावी अशी व्यवस्था दिवस-रात्र करण्यात आली आहे. एपीएमसीचे पेपरफुटी प्रकरण, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, राजकीय नेत्यांनी अध्यक्ष आणि सचिवांच्या भेटी घेऊन केलेली चौकशीची मागणी आणि विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
संतप्त विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत आणि या आंदोलनाचा संताप शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर कार्यालयात पाहायला मिळाला. एमपीएससीच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त आहे. असे असतानादेखील सावंत आणि राणे हे जे संभाजी ब्रिगेडचे दोन कार्यकर्ते एमपीएससीच्या कार्यालयापर्यंत वरपर्यंत पोहोचले आणि त्यांनी महेंद्र हरपाळकरांना शोधून त्यांच्या तोंडाला काळे फासले.