MPSC paper leak SIT : एमपीएससी पेपरफुटीची एसआयटीमार्फत चौकशी, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

MPSC paper leak SIT : एमपीएससी पेपरफुटीची एसआयटीमार्फत चौकशी, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
Published on
Updated on
Summary

- परीक्षांच्या उत्तर पत्रिकांची फेरतपासणी होणार

- आठ दिवसांत संबंधितांवर कठोर कारवाई

- परीक्षा व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणार

- विद्यार्थ्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन

मुंबई : एमपीएससीतील कथित पेपरफुटी प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी आणि पेपरची पुनर्तपासणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळादरम्यान तब्बल पावणेदोन तास सविस्तर आणि सखोल चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभारावर आणि परीक्षेतील गोंधळावर आपले सर्व आक्षेप पुराव्यांसह मांडले. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचे गांभीर्याने निरसन केले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले की, आमच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात येत्या आठ दिवसांच्या आत ठोस कारवाई केली जाईल, असा स्पष्ट शब्दही फडणवीस यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.

MPSC paper leak SIT : एमपीएससी पेपरफुटीची एसआयटीमार्फत चौकशी, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
MPSC Students: प्रथमेश देशमुखच्या मृत्यूने स्पर्धा परीक्षार्थी संतप्त; ‘ही आत्महत्या नव्हे, परीक्षा व्यवस्थेचा बळी’

या परीक्षांच्या उत्तर पत्रिकांची फेरतपासणीही केली जाईल. शिवाय, विद्यापीठांच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षांच्या उत्तर पत्रिका देण्याची मागणीही मान्य करण्याच्या सूचना दिल्या जातील. स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहारात गुंतलेले अधिकारी, विद्यार्थी किंवा दलालांना कोणत्याही परीस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आमच्या सर्व मागण्या मान्य : आंदोलक विद्यार्थी

आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले की, आंदोलनामागील नेमक्या मागण्या काय आहेत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या इतरही अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले

MPSC paper leak SIT : एमपीएससी पेपरफुटीची एसआयटीमार्फत चौकशी, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
MPSC Paper Leak Protest | 'मटक्याचे आकडे फुटत नाहीत, मग पेपर कसा फुटतो?' नाशिकमध्ये MPSC विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश

अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी कायम

एमपीएससीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केवळ आश्वासन पुरेसे नसून धोरणात्मक पातळीवर बदल होणे गरजेचे असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही कायम असल्याचे सांगण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्याना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असून विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीही उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगतील, असे सांगण्यात आले.

मुलाखती पुढे ढकलण्याबाबतही चर्चा

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ संदर्भात गुणांची फेरतपासणी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. तसेच मुलाखती पुढे ढकलण्याबाबतही चर्चा झाली. परीक्षेशी संबंधित सर्व बाबी व्ही. राधा समितीसमोर मांडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आरटीआयअंतर्गत आवश्यक कागदपत्रे व पेपर उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दळवी समितीच्या माध्यमातून गुणांशी संबंधित मुद्द्यांवरही निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील काळात वातावरण अधिक सकारात्मक होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news