MPSC Paper Leak Case: औषध निरीक्षक पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार आयोगातीलच अधिकारी! ३०० प्रश्न लॅपटॉपवर टाईप करून वरिष्ठांकडे सुपूर्द

औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपेढीतील गोपनीय प्रश्न बाहेर काढल्याचा आरोप; गुन्हे शाखेचे ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल
MPSC Question Paper Leak Case
MPSC Question Paper Leak Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आयोगातीलच अधिकाऱ्याने प्रश्नपेढीतील सुमारे ३०० प्रश्न लॅपटॉपवर टाईप करून त्याच्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आला आहे.

या प्रकरणातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते याला मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध ३ हजारहून अधिक पानांचे पहिले आरोपपत्र दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

MPSC Question Paper Leak Case
MHADA Chairman Post: म्हाडाचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? भाजप-शिंदे शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

औषध निरीक्षक पदासाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनातील १५४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रश्नपेढीतील गोपनीय प्रश्नांपर्यंत आयोगातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते याची पोहोच होती.

त्याच्याकडे प्रश्नांच्या मूळ संचाची (मेटा सेट) जबाबदारी होती. याच संचातून अंतिम प्रश्नपत्रिका तयार केली जाते. नाकते याने प्रश्नपेढीतील सुमारे ३०० प्रश्न स्वतःच्या लॅपटॉपवर टाईप केले. त्यानंतर त्याच्या प्रिंट काढून नवी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयाच्या वाहनतळावर अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

MPSC Question Paper Leak Case
Mumbai Robbery Case: पोलिस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांना लुटले; ४८ तासांत ९७.५० लाखांची रोकड हस्तगत

पेपरफुटी उघड झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने नाकते याने लेंडवे यांना कथित कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर प्रश्नांचा संच पुढे अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. आयोगातील गोपनीय विभागातील प्रश्नपेढीची सुरक्षा भेदून प्रश्न बाहेर कसे गेले, याचा तपशील आरोपपत्रात मांडण्यात आला आहे.

६ आरोपींविरुद्ध पहिले आरोपपत्र

गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट रोजी अटक केलेल्या पहिल्या सहा आरोपींचा या आरोपपत्रात समावेश आहे. त्यामध्ये सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते, अवर सचिव अभिजित लेंडवे, आयोगातील अधिकारी गोपाळ मराठे, मध्यस्थ प्रवीण पाटील, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि तिचा पूर्वीचा मित्र गौरव ऊर्फ लोकेश पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित तरतुदींनुसार तपास करण्यात आला आहे.

नातेसंबंध बिघडल्याने पेपरफुटी उघड?

या प्रकरणात ऋतुजा पाटील आणि गौरव ऊर्फ लोकेश पाटील यांच्यातील संबंध बिघडल्याने पेपरफुटीचा प्रकार उघड झाल्याचे आरोपपत्रातून समोर आले आहे. ऋतुजाने परीक्षेनंतर पालकांच्या विरोधामुळे गौरवशी बोलणे बंद केले होते.

पालकांनी या संबंधांना विरोध करत आत्महत्येची धमकी दिल्याचे ऋतुजाने पोलिसांना सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. याचा राग आल्याने गौरवने एमपीएससीला ई-मेल पाठवून ऋतुजाकडे परीक्षेपूर्वीच प्रश्न असल्याची तक्रार केली. सुरुवातीला पेपरफुटी उघड करणारा माहितीदार म्हणून पुढे आलेल्या गौरवचीही या प्रकरणातील कथित भूमिका तपासात समोर आली आहे.

१३ जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पहिल्या आरोपपत्रात सहाजणांविरुद्ध पुरावे सादर करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींच्या भूमिकेबाबत तपास सुरू असून डिसेंबरमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये संताप व्यक्त झाला होता. अखेर २५ ऑगस्ट रोजी औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपपत्रातून प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचा भंग कसा झाला, यंत्रणेतील कोणकोणत्या स्तरावर संगनमत होते आणि आणखी कोणाला या पेपरचा लाभ मिळाला, याबाबत महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.