

मुंबई : स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारल्यानंतरही केवळ काही गुणांच्या फरकाने सरकारी नोकरीची संधी हुकणाऱ्या हजारो गुणवंत तरुणांसाठी राज्य सरकारने करिअरचा नवा मार्ग खुला केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांमध्ये मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणीपर्यंत पोहोचलेल्या; मात्र अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना आता ‘निपुण सेतू’ या नव्या उपक्रमाद्वारे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘प्रतिभा सेतू’ उपक्रमाच्या धर्तीवर उद्योग विभागाने ‘मैत्री २.०’ पोर्टलअंतर्गत ‘निपुण सेतू’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. राज्यात दरवर्षी लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यापैकी अनेकजण मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणीपर्यंत मजल मारतात; मात्र मर्यादित पदसंख्येमुळे अंतिम निवडीपासून दूर राहतात. अशा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, संबंधित परीक्षेतील कामगिरी आणि संपर्क तपशील ‘निपुण सेतू’अंतर्गत एका सुरक्षित डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध राहणार आहे. राज्यातील उद्योग, कॉर्पोरेट कंपन्या, वित्तीय संस्था तसेच सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना या डेटाबेसच्या आधारे योग्य उमेदवारांची निवड करू शकतील. विशेष म्हणजे, ही माहिती केवळ अधिकृत आणि पडताळणी झालेल्या नियोक्त्यांनाच पाहता येणार असल्याने गोपनीयतेचीही काळजी घेण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सुरू झालेला हा उपक्रम स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो तरुणांसाठी आशेचा किरण मानला जात आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न अपूर्ण राहिले, तरी अनेक वर्षांच्या मेहनतीतून विकसित झालेली कौशल्ये आता उद्योगविश्वाच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत.
काय आहे ‘निपुण सेतू’?
‘निपुण सेतू’ हा उद्योग विभागाचा उपक्रम असून, तो ‘मैत्री २.०’ पोर्टलअंतर्गत कार्यान्वित केला जाईल. एमपीएससीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या; पण निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती त्यांच्या संमतीनंतर पोर्टलवर उपलब्ध केली जाईल. उद्योग, कंपन्या, वित्तीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना या उमेदवारांच्या कौशल्यांचा आढावा घेऊन त्यांना थेट रोजगाराच्या संधी देतील.