

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील मतभेद संपण्याचे नाव घेत नसल्याने परस्परात विलीन होण्याच्या हालचाली प्रत्यक्षात येणे सध्या तरी अवघड झाल्या आहेत. पवार कुटुंबात निर्माण झालेले ताण शमण्याची चिन्हे नसल्याचे भारतीय जनता पक्षात बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चेला ठाम नकार दिल्यामुळे आता शरद पवार राष्ट्रवादीनेही जाहीरपणे भाजपविरोधी भूमिका घेतली असल्याचे दिसते.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ‘ते बोलले त्यातले काहीही घडले नाही, भ्रष्टाचार संपला नाही’, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतरमंतर येथील उपोषणाला शुक्रवारी भेट दिल्यानंतर सुप्रिया सुळे शनिवारी मुंबईत आल्या होत्या. त्यांच्या घशाला दाहसंसर्ग झाला आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे आवश्यक तेवढेच बोलण्याचा वैद्यकीय सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव भाजपने पाठवला नाही
मात्र तरीही माध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाबद्दल कोणताही प्रस्ताव भाजपने आम्हाला पाठवलेला नाही. आमचीही तशी कोणतीही इच्छा नसल्याचा दावा केला. प्रत्यक्षात दिल्ली येथील भाजपचे ज्येष्ठ नेते या प्रस्तावावर गेले दोन दिवस चर्चा सुरू असल्याचे सांगत आहेत. सुप्रिया सुळे यांनी तरतुदी बघून परिसीमन विधेयकासंदर्भात काय ते ठरवू, एनडीएला यासंदर्भात पाठिंबा द्यायचा काय त्याचा निर्णय त्यावेळी होईल अशी भूमिका घेत इंडिया आघाडीला काहीशी प्रतिकूल वाटणारे विधान करीत आहेत.
विलीनीकरण न होता केवळ परिसीमन विधेयकाला पाठिंबा
सुनेत्रा पवार गटाच्या नकारात्मक भूमिकेमुळे आता नेमके काय होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विलीनीकरण न होता केवळ विधेयकाला शरद पवार राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता बोलली जात आहे.
विद्यमान मित्रांना दुखावून कोणताही निर्णय नाही : भाजप
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घेतलेल्या भेटीगाठी, त्यानंतर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मतदारसंघातील नगराध्यक्ष निवडीचे कारण देत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधलेला संवाद या जवळ येण्याच्या प्रक्रियेचा भाग मानला जात होता. राष्ट्रीय अध्यक्षपद मिळत नसेल तर पार्थ पवार यांचा एकत्र येण्यास नकार असल्यामुळे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या विद्यमान मित्रांना दुखावून कोणतेही निर्णय घेतले जाणार नाहीत, अशी भाजपची भूमिका आहे.
पाठिंब्याचे आकडे जुळवण्याची तयारी पूर्ण
संसदेच्या कामकाजात परिसीमन विधेयक कार्य पत्रिकेवर दाखवले गेले नसले तरी त्या संदर्भातील पाठिंब्याचे आकडे जुळवण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचेही बोलले जाते आहे. दरम्यान शनिवारी सुप्रिया सुळे मुंबईत एका सार्वजनिक समारंभात राहुल देशपांडे यांच्या गायनानिमित्त भाजपचे नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या समवेत होत्या. त्यानंतर रात्री संसदेच्या अधिवेशनासाठी त्या दिल्लीला गेल्या. पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री केले जावे याबद्दलही काही कागदपत्रे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.
सध्या थांबा आणि वाट पाहा; भाजपची भूमिका
येणाऱ्या काही दिवसांमध्ये घडामोडी वेग घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विलीनीकरणासंदर्भात जाहीरपणे काहीही बोलत नसले, तरी त्यांचा कल पक्ष एक झाला तर त्याचा फायदा होईल अशा दिशेने आहे. यात भाजपची भूमिका अर्थातच महत्त्वाची ठरणार आहे. प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने सध्या थांबा आणि वाट पाहा अशी भूमिका घ्यायची ठरवले आहे. संसदेच्या अधिवेशनानिमित्त आता दिल्लीतच यासंबंधी काही घडामोडी घडतील असे दिसते.
परिसीमन विधेयकाला पाठिंब्याची भाजपला आशा
सध्या विलीनीकरणाबाबत काहीही होणार नाही असे गृहीत धरले, तरी परिसीमन विधेयकाबाबत मात्र पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आजही भाजपच्या गोटात व्यक्त केली जाते आहे. यासंदर्भात पुढच्या दोन-तीन दिवसांत हालचाली होतील.