

Ajit Pawar's explanation about Maharashtra Olympic Association
मुंबई: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार संदीप जोशी यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांवर केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून, यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी न स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर
अजित पवार म्हणाले की, मी 2013 पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. या काळात खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम केलेले आहे. आमच्या नेतृत्वापूर्वी महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातव्या किंवा आठव्या स्थानी होता. मात्र मागील तीन स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने अव्वल म्हणजे पहिला क्रमांक पटकावला आहे. खेळातील हे यश खेळाडू, अधिकारी आणि प्रशिक्षकांच्या मेहनतीमुळेच शक्य झाले आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, काही राजकीय व्यक्ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रीडाक्षेत्रात राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याबाबत खेळाडूंनी कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे क्रीडाक्षेत्रात राजकीय हेतूने आरोप करणे हे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही.
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की 13 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्या पदाधिकाऱ्यावर आहेत, ते खजिनदारच नाहीत. निधीचा वापर हा कार्यकारिणीच्या मान्यतेनंतरच होतो. खजिनदार धनंजय भोसले यांच्याकडे संपूर्ण हिशोब आहे. तर काही संलग्न संघटनांकडून हिशेब न आल्यामुळे उशीर झाला. या संघटनांमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या संघटनेचाही समावेश आहे. शासनाने हिशेब सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही धर्मादाय संस्था आहे आणि तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडेच दाखल व्हायला हव्यात. परंतु राजकीय दबावाखाली पहाटे तीन वाजता गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये पोलिसांवर कोणी दबाव टाकला, हे संदीप जोशी यांनी सांगावं, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सहा प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल झाली होती, परंतु न्यायालयाने ती सर्व फेटाळली. तरीही त्याच कारणांसाठी पुन्हा तक्रारी दाखल करून पोलिसांना दबावाखाली काम करायला लावणे हे चुकीचे आहे.
अजित पवार यांनी खेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून दबाव टाकला जात असल्याच्या आरोपालाही उत्तर देत सांगितले की, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे खेळाडूंशी संवाद साधत असतात, याचा अर्थ ते दबाव आणत आहेत असा तर होत नाही. अनेक संघटनांनी हिशेब अद्याप सादर केलेले नाहीत. त्यात मुरलीधर मोहोळ यांच्या संघटनेचाही समावेश आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करणे योग्य नाही. मुळात खेळामध्ये खिलाडूवृत्ती हवी, सूडाची भावना नको. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करून खेळाडूंना आणि संघटनांना अडचणीत आणणे चुकीचे आहे. आम्ही केलेल्या कामाच्या आधारेच संघटना आम्हाला पुन्हा निवडतील असा मला विश्वास उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी यावेळी व्यक्त केला.