

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना राज्यातील मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेने आंदोलन उभं केले आहे. या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदी सक्तीला विरोध करावा, असे आवाहन केले आहे.
मराठी शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांनी आंदोलनाबाबतची रूपरेषा मांडली आहे. मनसे नेते देशपांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आम्ही या विषयात काय करणार, हे येत्या दिवसांत दिसेलच, पण एक सांगतो की आमचा संघर्ष हा टोकाचा असणार आहे. विविधतेत एकता हा आपला नारा आहे. मग, ही विविधताच तोडायला सरकार निघाले आहे. राष्ट्रगीतातही सर्व भाषांचा उल्लेख असल्याचे देशपांडे म्हणाले.
अभिनेते, निमति, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीसुद्धा या मुद्द्यावरून मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. मध्यंतरी मांजरेकर यांनी राज ठाकरे त्यांच्याशी एका पॉडकास्टमध्ये चर्चा करताना मराठी भाषेसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी केलेले भाष्य मांजरेकर यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा समाज माध्यमांमध्ये जारी केले. शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणे गरजेचे आहे. नुसता भाषा दिवस साजरा करणे किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणे याने मराठी राहणार नाही. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर आम्हाला अशी प्रगती नको. अशा आशयाचा राज ठाकरे यांचा व्हिडीओ मांजरेकर यांनी समाज माध्यमातून जारी केला आहे.