

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली आहे. या एका जागेसाठी ठाकरे शिवसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची नावे आघाडीवर आहेत.
विधान परिषदेचे सदस्य म्हणून उद्धव ठाकरे निवृत्त झाले आहेत. ते पुन्हा परिषदेवर जाणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक असतील तर आघाडीकडून कोणीही उमेदवार देणार नाहीत.
असे असतानाही या एका जागेसाठी ठाकरे गटातून माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांच्यासह अंबादास दानवे व सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत आहेत.
दानवे हे काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेतून निवृत्त झाले. विरोधी पक्षनेते असताना दानवे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून सरकारवर हल्ला चढवला होता.
आक्रमक चेहरा म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.सुषमा अंधारे यांचेही नाव विधान परिषदेसाठी शर्यतीत आहे. पुणे, सातारा येथील ड्रग्ज प्रकरण, महिला अत्याचार, खरात प्रकरणांसह अनेक प्रकरणांत अंधारे यांनी सरकारविरोधात भूमिका घेत जाब विचारला होता.