Mithi Scam ED Summons
मुंबई : मिठी नदी गाळ काढण्यात झालेल्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सिनेअभिनेता दिनो मोरिया याला ईडीने चौकशीसाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदी घोटाळ्यात तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना अटक केली होती. या कटात दिनो मोरियाचा सहभाग उघडकीस येताच दोन्ही बंधूंची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळा चौकशी करण्यात आली. या चौकशीतून मनी लाँडरिंग झाल्याचे उघडकीस आले आणि या प्रकरणाचा तपास ईडीकडे गेला.
शुक्रवारी मुंबईसह केरळात पंधरा ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यात दिनो मोरियाच्या वांद्रे येथील घरासह कार्यालय, महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित कॉन्ट्रक्टर आदींच्या घरांचा समावेश होता. त्यात हाती आलेल्या दस्तऐवजात दिनो मोरियाच्या सहभागाबाबत काही पुरावे सापडल्याने याआधी दोनदा चौकशी होऊनही ईडीने त्याला पुन्हा समन्स बजावले आहे.