

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती व महिला, बाल कल्याण समिती सभापती तसेच उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. त्यात स्थायी सभापतीपदी भाजपचे हसमुख गेहलोत यांची बहुमताने निवड करण्यात आली. तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या अनिता पाटील व उपसभापती पदी हेमा बेलानी यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुका पिठासीन अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नियंत्रणाखाली पार पाडण्यात आल्या. यातील स्थायी सभापती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपचे हसमुख गेहलोत व विरोधी पक्षातील काँग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तत्पूर्वी 18 फेब्रुवारीच्या पहिल्या महासभेत स्थायी समितीमध्ये एकूण 16 तर महिला व बाल कल्याण समितीमध्ये एकूण 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्थायीमध्ये सत्ताधारी भाजपच्या 13 तर विरोधी पक्षातील
काँग्रेसचे 2 व शिवसेनेच्या एका सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांमधून सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक पार पाडण्यात आली. त्यात हसमुख गेहलोत यांना एकूण 13 तर अनिल सावंत यांना 3 मते मिळाली. यात हसमुख यांची बहुमताने निवड झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले. याचप्रमाणे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पाडण्यात आली. या समितीत एकूण 9 सदस्यांपैकी सत्ताधारी भाजपच्या 7 तर विरोधी पक्षातील काँग्रेसच्या 2 सदस्यांचा समावेश आहे.
विरोधी पक्षाचे दोनच सदस्य असल्याने नियमानुसार त्यांच्या उमेदवाराला सूचक व अनुमोदक हे दोन सदस्य आवश्यक ठरले होते. मात्र या समितीत विरोधी पक्षातील काँग्रेसचे केवळ दोनच सदस्य असल्याने या पक्षाच्या उमेदवारीला ब्रेक लावण्यात आला. या अनुषंगाने सभापती पदासाठी भाजपच्या अनिता पाटील व उपसभापतीसाठी हेमा बेलानी यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले. यावेळी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, नगरसचिव दिनेश कानगुडे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते.