

मुंबई; प्रतिनिधी : देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबईत दररोज तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण होत असून दर दोन दिवसांत तीन अल्पवयीना नराधमांच्या वासनेच्या शिकार ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव मुंबई पोलिसांच्या दप्तरी दाखल होत असलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. मुंबईमध्ये यावर्षी एप्रिलपर्यंत अल्पवयीन मुलींशी संबंधीत ७९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०७ मुली नराधमांच्या वासनेच्या शिकार ठरल्या. तर, ४०४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून यातील ७३ जणींचा पोलीस अद्यापही शोध घेऊ शकले नाहीत.
महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी अत्याचार काही कमी झाले नाहीत. या वर्षीच्या एप्रिल अखेरपर्यंत शहरात २०७ अल्पवयीन मुली नराधमांच्या वासनेच्या बळी ठरल्या. याप्रकरणी बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन पोलिसांनी यातील १९८ गुन्ह्यांची उकल केली. तर, नऊ गुन्ह्यांची उकल पोलीस करू शकले नसून हे नराधम आजही मोकाट फिरत आहेत. तर, अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांतही वाढ झाली असून जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात विनयभंगाचे १६६, छेडछाडीचे सात आणि पोक्सो कायद्यान्वये अन्य १० गुन्हे दाखल झाले आहेत.
शहरात महिलांवरील वाढत्या अत्याचारांसोबतच लहान मुले, मुलींवर लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषणासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, लहान मुले, मुली गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट बनले आहेत. लहान मुलांवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये त्यांच्या कुटुंबातील नातेसंबंधातील जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडूनच ही लहान मुले वासनेचे बळी ठरत असल्याचे दिसून येते.