

मुंबई ः सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका पंधरा वर्पांच्या मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध कुरार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगा पळून गेल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
पीडित मुलगी ही मालाड येथे तिच्या कुटुंबियासोबत राहत असून ती सध्या शिक्षण घेते. तिच्याच शेजारी आरोपी मुलगा राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत पिडीत मुलगी घरात एकटीच असताना आरोपी तिच्या घरी आला होता.
यावेळी त्याने तिच्यावर दोन वेळेस जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तिला बघून घेण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र त्याच्याकडून पुन्हा अशी घटना होण्याची शक्यता असल्याने तिने दोन दिवसांपूर्वीच पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे तिने मंगळवारी कुरार पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी मुलाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याच गुन्ह्यांत त्याला ताब्यात घेऊन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.