Milk Adulteration: दुधात डिटर्जंटसह धोकादायक रसायन! पुण्यापासून इंदापूरपर्यंत भेसळीचे जाळे; २५ जणांना अटक

मंचरपासून सुरू झालेल्या तपासात भेसळयुक्त दूध इंदापूरच्या सोनाई डेअरीपर्यंत पोहोचल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न; ३७ आरोपी निष्पन्न
Milk Adulteration
Milk AdulterationAI Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: दुधात डिटर्जंटसह धोकादायक रासायनिक पदार्थ नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट मिसळून कृत्रिम व भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या साखळीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचरपासून सुरू झालेल्या तपासात भेसळयुक्त दूध थेट सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेड (सोनाई डेअरी), गोखळी, इंदापूर या प्रक्रिया डेअरीपर्यंत पोहोचत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले असून २५ जणांना अटक करण्यात आली आहे.

Milk Adulteration
GTB Nagar Redevelopment: जीटीबी नगरातील अपात्र गाळेधारकांना मुदत; स्वेच्छेने गाळे रिकामे न केल्यास तोडणार

मंचर परिसरातील गुप्त माहितीनंतर ४ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवसरी खुर्द येथील ‘नवकार डिस्ट्रिब्युटर्स’वर कारवाई केली. तेथे व्हे पावडर, व्हे पर्मिएट पावडर, डिटर्जंट, इमल्सिफायर आदी संशयित पदार्थ आढळले. या कारवाईनंतर तपासाचा विस्तार पुरवठादार, साठवणूकदार, दूध संकलन व शीतकरण केंद्रे आणि प्रक्रिया डेअऱ्यांपर्यंत करण्यात आला.

मंचर येथील आकाश डेअरी फार्ममधून घेण्यात आलेल्या सहाही दूध नमुन्यांमध्ये प्रयोगशाळेच्या अहवालानुसार डिटर्जंट आढळले. पूरक अहवालात या सर्व नमुन्यांमध्ये अल्फॉक्स-२०० इथॉक्सिलेट अर्थात नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट आढळल्याचे नमूद आहे.

तसेच या नमुन्यांमधील फॅट आणि एसएनएफचे प्रमाणही निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे समोर आले. मंचर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले आहेत. २५ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून १२ आरोपींना अटकपूर्व जामीनमिळाला आहे.

Milk Adulteration
FMGE Fake Marksheets: एफएमजीई नापास, तरी डॉक्टर म्हणून नोंदणी; बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

मंचर तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, पिलीव येथील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स योगिनीनाथा मिल्क सप्लायर्स टँकर क्रमांक एमएच-४३-बीपी-९५९७ सोनाई डेअरी, गोखळी, इंदापूर अशी पुरवठा साखळी प्रथमदर्शनी समोर आली आहे. या साखळीला पुष्टी देणारी दूध वितरण चलने आणि टँकर पोहोच चलने तपास यंत्रणेला मिळाली आहेत.

कॅडिलाच्या तीन गोदामांचे परवाने रद्द

एकाच ब्रँडच्या नावाखाली वेगवेगळे औषध घटक असलेली औषधे बाजारात उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या राज्यातील तीन सीएफए गोदामांवर कारवाई केली आहे. पुणे, नागपूर आणि ठाणे येथील कंपनीच्या सीएफए गोदामांचे औषध विक्री व वितरण परवाने रद्द करण्यात आले आहेत.

माळशिरसमध्ये १६,७३० लिटर दूध नष्ट

पिलीव येथील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या दुधाच्या नमुन्यात फॅट २.७ टक्के, एसएनएफ ७.०४ टक्के आणि डिटर्जंट पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे ७,६३४ लिटर दूध, किंमत ३ लाख ५ हजार ३६० रुपये, जागेवर नष्ट करण्यात आले.

तर डेलीविश अ‍ॅग्रो डेअरी प्रॉडक्ट प्रा. लि.च्या दुधाच्या नमुन्यात फॅट २.५ टक्के, एसएनएफ ७.२८ टक्के आणि डिटर्जंट आढळले. या कारवाईत ९,०९६ लिटर दूध, किंमत ३ लाख ६३ हजार ८४० रुपये, नष्ट करण्यात आले.

दोन्ही कारवायांत मिळून १६ हजार ७३० लिटर दूध आणि सुमारे ६ लाख ६९ हजार २०० रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांत माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news