

मुंबई : मुंबई काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे पुत्र व माजी खासदार मिलिंद देवरा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मिलिंद यांच्या यासंदर्भात आतापर्यंत दोन भेटी झाल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळेल या शक्यतेने देवरा हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत गंभीरपणे विचार करीत आहेत. मुंबईत अजित पवार गटाची फारशी ताकद नाही. लोकसभा उमेदवारांच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादीने चाचपणी केली असता मिलिंद यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पटेल आणि मिलिंद यांच्यात आतापर्यंत दोन बैठका झाल्याचे समजते. अजित पवार गट हा सध्या भाजपसोबत असल्याने भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे धर्मनिरपेक्षवादी मते मिळून आपण विजयी होऊ असे देवरांना वाटते. दक्षिण मुंबई मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. परंतु येथे गुजराती भाषिक मतदारांचीही संख्या लक्षवेधी आहे.
साहजिकच, महायुतीमध्ये या मतदारसंघावर भाजपाचा दावा असेल; परंतु आपल्याला परंपरागत मतदारसंघातच उमेदवारी मिळावी, असा मिलिंद यांचा आग्रह आहे. कारण २००४, २००९ मध्ये ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून विजयी झाले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीही होते. आता भाजपच्या मदतीने पुन्हा खासदार व्हावे असे त्यांना वाटते.
• मुरली देवरा हे अनेक वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्यापश्चात मिलिंद यांनीही या पदाची जबाबदारी सांभाळली होती. मुरली देवरा यांच्यामुळे मिलिंद यांचेही मुंबईत कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, अलीकडे पक्षात गटबाजी वाढल्यामुळे ते नाराज असल्याचे समजते.