

मुंबई: मुंबईतील एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींपैकी सुमारे ७.५ टक्के रुग्ण नियमित उपचारांच्या पाठपुराव्याबाहेर गेले आहेत. नियोजित भेटी चुकवणे, उपचार केंद्राशी संपर्क तुटणे किंवा सरकारी उपचार सेवा सोडल्याच्या नोंदी या रुग्णांमध्ये आहेत.
एप्रिल ते जून २०२६ या २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उपचारांच्या पाठपुराव्याबाहेर गेलेल्या रुग्णांचे प्रमाण २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत १५.४ टक्के होते. २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत ते ९.३ टक्क्यांवर आले. एप्रिल-जून २०२६ मध्ये हे प्रमाण आणखी घटून ७.५ टक्क्यांवर आले. यात नियमित उपचारासाठी येणे बंद केलेले, वारंवार नियोजित भेटी चुकवणारे आणि सरकारी उपचार सेवा सोडल्याची नोंद असलेले रुग्ण समाविष्ट आहेत.
सरकारी उपचार सेवा सोडल्याची नोंद झाली म्हणजे संबंधित रुग्णाने उपचार पूर्णपणे बंद केले आहेत, असा थेट अर्थ काढता येणार नाही. काही रुग्ण खासगी रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रांतून उपचार घेत असण्याची शक्यता आहे.
तसेच स्थलांतरामुळेही काही रुग्ण सरकारी उपचार व्यवस्थेच्या नियमित संपर्कात राहत नसल्याचे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रमुख डॉ. विजयकुमार करंजकर यांनी सांगितले.
एचआयव्ही रुग्णांना एआरटी औषधे घेण्यासाठी ठराविक वेळापत्रकानुसार उपचार केंद्रात जावे लागते. रुग्ण नियोजित दिवशी आला नाही, तर त्याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो.
२८ दिवसांच्या आत तो उपचार केंद्रात परतला नाही, तर त्याची ‘पाठपुरावा चुकलेला रुग्ण’ अशी नोंद होते. त्यानंतर संबंधित रुग्णाच्या घरी भेट देऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अशी नोंद झाली म्हणजे रुग्णाने एआरटी औषधे घेणे पूर्णपणे बंद केले आहे, असे मानता येणार नसल्याचे डॉ. करंजकर यांनी स्पष्ट केले.
एकावेळी तीन महिन्यांचा औषधसाठा
एचआयव्ही रुग्णांना एकावेळी तीन महिन्यांचा एआरटी औषधसाठा देण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल-जून २०२६ मध्ये ७४.९ टक्के रुग्णांना तीन महिन्यांची औषधे देण्यात आली. मागील वर्षाच्या याच कालावधीत हे प्रमाण ६१.५ टक्के होते, तर २०२४-२५ मध्ये ते ३५.३ टक्के होते. यामुळे रुग्णांना उपचार केंद्रात वारंवार जाण्याची गरज कमी होते.
एप्रिल-जून २०२६ मध्ये एआरटी उपचार सुरू केलेल्या रुग्णांमधील नोंदवलेले मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के होते. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते २.१ टक्के होते. उपलब्ध आकडेवारीनुसार उपचार सुरू केलेल्या रुग्णांमधील नोंदवलेल्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे.
एआरटी उपचार सुरू करण्याच्या निकषांतर्गत असलेल्या ९३.९ टक्के रुग्णांनी एप्रिल-जून २०२६ मध्ये उपचार सुरू केले. मात्र, मागील वर्षी याच कालावधीतील ९७.५ टक्के होते.