मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीची मुदत संपली असून 1 लाख 58 हजार 424 अर्ज अनामत रकमेसह दाखल झाले आहेत. त्यापैकी बहुतांश अर्ज हे केवळ 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांसाठी दाखल झाले आहेत.
एकूण 1 लाख 84 हजार 994 अर्ज आले आहेत. त्यापैकी 1 लाख 70 हजार 135 अर्ज हे 20 टक्के सर्वसमावेशक योजनेसाठी आहेत. मात्र एकूण अर्जांपैकी केवळ 1 लाख 58 हजार 424 जणांनीच अनामत रक्कम भरल्याने 20 टक्के योजनेतील घरांसाठी आलेल्या अर्जांची संख्या काहीशी कमी असेल. सर्वाधिक अर्ज याच योजनेसाठी आहेत. पण, घरे फक्त 565 आहेत.
एकूण अर्जांपैकी 5 हजार 953 अर्ज हे 15 टक्के सर्वसमावेशक योजनेसाठी आहेत. यात 3 हजार 2 घरे आहेत. म्हाडाने बांधलेल्या 1 हजार 677 घरांसाठी 6 हजार 346 अर्ज आले आहेत. 50 टक्के परवडणार्या घरांच्या योजनेत केवळ 42 घरे असून त्यासाठी 1 हजार 704 अर्ज आले आहेत. म्हाडाच्या 77 भूखंडांसाठी 856 जणांनी अर्ज केले आहेत.