मुंबई : राज्यातील व्यवस्थापनशास्त्र अर्थात एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा 42 हजार 642 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, 10 हजार 867 जागा रिकाम्या राहिल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत प्रवेशसंख्या वाढली असली तरी, गेल्या काही वर्षांपासून असलेली ‘मॅनेजमेंट क्रेझ’ कमी झाल्याचे या रिक्त जागांवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या दीड दशकात एमबीएची पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होती.उत्तम प्लेसमेंट मिळते, या आशेने बाहेरच्या राज्यांतील विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने एमबीएकडे धाव घेत होते. त्यामुळे राज्यात व्यवस्थापन महविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढली होती. यंदा मात्र प्रवेशात फारसा परिणाम दिसलेला नाही.
बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यंदा जागा कमी असूनही रिक्ततेचे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक आहे. अर्ज करणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती मात्र वाढत्या क्षमतेच्या तुलनेत प्रवेशाचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 466 प्रवेश अधिक झाले असले तरी 3 हजार जागांची वाढ झाली होती. 53 हजार 509 इतक्या जागापैकी 42 हजार 642 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये एकूण 50 हजार 497 इतकी प्रवेश क्षमता होती. त्यापैकी 42 हजार 176 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि 8 हजार 321 जागारिकाम्या राहिल्या होत्या. तर प्रवेशाचे प्रमाण 83.52 टक्के इतके होते. तर 2025-26 मध्ये प्रवेशातील व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या जागांत वाढ होवून 53 हजार 509 इतक्या जागा झाल्या होत्या तर यापैकी 42 हजार 642 जागांवर यंदा प्रवेश झाले आहेत. प्रवेशसंख्या थोडीशी वाढली असली तरी जागांच्या तुलनेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटून 79.69 टक्क्यांवर आले आहे.
यामुळे यंदा तब्बल जागा 10 हजार 867 इतक्या जागा शिल्लक राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच फेरीमध्ये 18 हजार 13 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हे प्रमाण एकूण प्रवेशांपैकी तब्बल 42.24 टक्के इतके होते. दुसर्या फेरीत आणखी 9 हजार 841 विद्यार्थ्यांनी तर तिसर्या फेरीमध्ये केवळ 4 हजार 130 इतक्या विद्यार्थ्यांनी तर चौथ्या फेरीत 3 हजार 86 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.
संस्थास्तरावरील फेरीतही यंदा प्रवेश घेणार्यांची संख्या मात्र कमी झाली. गेल्या वर्षी 10 हजार 442 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर यंदा केवळ 7 हजार 594 इतक्या जणांनी घेतला आहे. वाढीव जागांच्या तुलनेत एकूण प्रवेशाचे प्रमाण घटले आहे.