

Government Employees Notice
मुंबई : आता शासकीय कर्मचार्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅप, ईमेलवरही पाठविली जाणार आहे. शिस्तभंगाच्या नोटीसीला वेळेत उत्तर देता यावे आणि यासंदर्भातील कारवाईला गती देण्यासाठी आता ईमेल आणि व्हॉट्सअॅपवरही नोटीस पाठविली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे शिस्तभंगाच्या प्रकरणांचा निपटारा जलद होण्याची अपेक्षा आहे.
यापूर्वी दोषारोप पत्र किंवा चौकशी अहवाल अशी शिस्तभंगाशी संबंधित कागदपत्रे व्यक्तिशः किंवा टपालाने पाठवली जायची. मात्र, अनेकदा ही कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे आता सरकारने नवीन पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. आता शासकीय कर्मचार्यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ही कागदपत्रे पाठवली जाणार आहेत. याशिवाय, व्हॉट्सअॅपद्वारेही नोटिसा पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे कर्मचार्यांना जलद माहिती मिळेल आणि त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधीही लवकर मिळेल.
व्यक्तिशः किंवा टपालाने कागदपत्रे पाठवण्याची जुनी पद्धतही कायम राहणार आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाजाला गती देण्यावर भर दिला जाईल. यासाठी शासकीय ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅपचा वापर करताना संबंधित व्यक्तीने पोचपावती देणे बंधनकारक आहे. ही पावती प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडली जाईल. हा निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1979 आणि निवृत्त कर्मचार्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 अंतर्गत लागू होईल. सरकारचा हा निर्णय शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा मानला जात आहे.