

मुंबई: बुधवारी दुपारी मेट्रो 3 मार्गावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ 2 म्हणजेच सीएसएमआयए टी 2 मेट्रो स्थानक येथे अचानक धूर निघाल्याने एकच गोंधळ उडाला.
मेट्रो प्रशासनाने तात्काळ ही परिस्थिती काही क्षणांत नियंत्रणात आणली. कोणतीही हानी होऊ नये यासाठी संबंधित स्थानकावर गाड्या थांबवून प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. सावधगिरीचा उपाय म्हणून स्थानक काही काळासाठी रिकामे करण्यात आले.
मेट्रो स्थानकात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सहार रोड मेट्रो स्थानक ते आरे मेट्रो स्थानक या दरम्यान मेट्रो सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. संध्याकाळी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करून मेट्रो सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र धूर कशामुळे निघाला याचा तपास सुरू आहे.