

Megablock today on all three lines in Mumbai section of Central Railway
मुंबई : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे: सीएसएमटी–विद्याविहार अप-डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०. ५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्ग: पनवेल–वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पनवेल–सुटणाऱ्या सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार असून, पनवेल–बेलापूरहून जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवाही रद्द राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे: बोरीवली–राम मंदिर स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. ब्लॉक काळात सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरीवली–अंधेरीदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून, काही लोकल अंधेरी–बोरीवलीदरम्यान हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत वळवण्यात येतील.
कोकण रेल्वेवर २० दिवस ब्लॉक; प्रवाशांना फटका कोकण रेल्वे मार्गावर १ ते २० ऑक्टोबरदरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. अस्नोटी आणि कारवार स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार असून, काही गाड्या मार्गातच थांबवण्यात येणार आहेत.
मडगावहून गाड्या उशिराने सुटणार
८, ९, ११, १६ आणि १८ ऑक्टोबरला मडगावहून सुटणारी गाडी क्रमांक ४६६१५ सुमारे ९० मिनिटे उशिराने रवाना होईल.
तसेच ६, १३ आणि २० ऑक्टोबरला हीच गाडी निर्धारित वेळेपेक्षा १६० मिनिटे म्हणजेच २ तास ४० मिनिटे उशिराने सुटणार आहे. या विलंबाचा परिणाम प्रवाशांच्या पुढील प्रवासावर होण्याची शक्यता आहे.
मंगळूरहून येणारी गाडी कारवारपर्यंतच
८ आणि १५ ऑक्टोबरला सुटणारी गाडी क्रमांक ४६६१६ मंगळूर सेंट्रल–मडगाव जंक्शन एक्स्प्रेस कारवारपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे कारवार ते मडगावदरम्यान ही गाडी रद्द राहणार आहे. ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वेळेचा फटका बसण्याची शक्यता असून, सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.