Mumbai News : वैद्यकीय विद्यार्थ्यांना विदेशी दारे खुली

Mumbai News : वैद्यकीय विद्यार्थ्यांना विदेशी दारे खुली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (एनएमसी) जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाची (डब्ल्यूएफएमई) १० वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भारतातील वैद्यकीय पदवीधारकांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड येथे वैद्यकीय प्रशिक्षण आणि पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

डब्ल्यूएफएमईचा जगातील वैद्यकीय शिक्षण आणि मान्यता यात सर्वांत वरचा क्रमांक लागतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एनएमसीला पुढील १० वर्षांसाठी डब्ल्यूएफएमईकडून मान्यता मिळाली आहे. एनएमसीच्या स्थापनेपासून चार वर्षांत जागतिक स्तरावर मिळालेल्या या मान्यतेचा देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना तसेच वैद्यकीय संस्थांना मोठा फायदा होईल. एनएमसीने वैद्यकीय शिक्षणात उच्च दर्जा प्रस्थापित केला असून जागतिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते बदल केले आहेत. भारताचे वैद्यकीय शिक्षण आणि व्यवस्थेचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या मान्यतेचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. यामुळे भारतीय विद्यार्थी जगाच्या कोणत्याही ठिकाणी जाऊन आपले करिअर करू शकतात. तसेच इतर देशांतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे.

जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर अनेक सकारात्मक बदल घडून येतात. शिवाय, आता अनेक देशांशी सामंजस्य करार केले जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. यामुळेच एमबीबीएस आणि पीजी स्तरा- वरही जागांच्या संख्येतही वाढ झाली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. कोविडची लस असो किंवा इतर देशांना औषधांचा पुरवठा असो, संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून भारताने आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. ही प्रतिष्ठेची मान्यता म्हणजे वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च दर्जासाठी एनएमसीच्या बांधिलकीचा दाखला असल्याचेही दिसून येत आहे.

या निर्णयानंतर, भारतातील सर्व ७०६ विद्यमान वैद्यकीय महाविद्यालयांना डब्ल्यूएफएमईकडून मान्यता मिळेल आणि येत्या १० वर्षांत स्थापन होणाऱ्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनाही यामुळे आपोआप मान्यता मिळेल. ही मान्यता भारतातील वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यास अधिक चालना देईल. हे पाऊल वैद्यकीय विद्यार्थ्यांना पीजी करण्यासाठी आणि इतर देशांमध्ये वैद्यकीय सराव करण्यास मदत करेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news