

मुंबई ः राज्यातील तसेच देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरी लांबणीवर पडली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी)ने नव्याने मान्यता दिलेल्या जागांचा समावेश या फेरीत होणार असल्याने मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय एनआरआय विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी अद्याप पूर्ण न झाल्यामुळेही फेरीला विलंब झाला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली फेरी झाल्यानंतर एनएमसीने देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना व जागा वाढीला मान्यता दिली आहे. तसेच अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एमसीसीकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची दुसरी फेरी राबविण्यास विलंब होत आहे. अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असताना वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय मिळेल याची शाश्वती नसल्याने त्यांना अन्य पर्यायांची चाचपणीही करणे शक्य होत नसल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
पहिल्या फेरीत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये एकूण 4 हजार 920 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 4 हजार 887 जागांवर प्रवेश निश्चित झाला असला तरी केवळ 4 हजार 417 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याने 503 जागा रिकामी राहिल्या आहेत. तर खासगी महाविद्यालयांमध्ये 3 हजार 219 पैकी 2 हजार 431 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तब्बल 788 जागा रिक्त आहेत. बीडीएस अभ्यासक्रमाच्या बाबतीत शासकीय महाविद्यालयांमध्ये 325 पैकी 311 जागांवर प्रवेश निश्चित झाला. पण प्रत्यक्ष प्रवेश घेणार्यांची संख्या फक्त 171 असल्याने 154 जागा रिक्त आहेत. खासगी महाविद्यालयांत 2 हजार 400 पैकी 2 हजार 398 प्रवेश निश्चित झाले असले, तरी केवळ 790 विद्यार्थी हजर राहिल्याने 1 हजार 610 जागा रिक्त आहेत.