

मुंबई : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ आणि स्थगिती मिळवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारने भूसंपादनाच्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा कोणत्याही प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अलमट्टीचा पाणीसाठा वाढल्यास पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सांगली कोल्हापूरला पुराचा धोका वाढतो. मागील काही वर्षांतील महापुरांनी ही बाब अधोरेखित केली आहे.
शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याचा कर्नाटकचा प्रयत्न हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान
कर्नाटक सरकारने येथील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यावरूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ते म्हणाले, शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी करण्याचा प्रयत्न हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. हा प्रकार दु:खद असला, तरी त्याचे नवल वाटत नाही. छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची परंपरा पंडित नेहरूंच्या काळापासून काँग्रेसमध्ये आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात त्यांनी जी मते व्यक्त केली ती सर्वांसमोर आहेत. तीच परंपरा काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या सरकारांमध्ये कायम असल्याचे दिसते. ईश्वराने काँग्रेसच्या कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाने स्वराज्य पाहिले त्यांचे नाव बदलून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न न करण्याची सद्बुद्धी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लाभावी, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा समाचार घेतला.