

मुंबई : माथाडी कामगार युनियनच्या नावाखाली स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करून कंपन्या, बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या संघटित टोळीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार आहेत.
नदीम नसरुद्दीन शेख (वय २७) याच्यासह सात आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून एका व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांड्याने डोक्यात आणि पायावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांनुसार कारवाई करण्यात आली.
सात आरोपी अटकेत
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पुरण अरुण सिंग उर्फ चड्डा (३९), रोहित मधुकर साळुंखे (२७), इम्रान बसुद्दीन हवालदार (३७), सुरेश गुलाबचंद गौड उर्फ किसन (३०), आकाश मानसिंग सिंग उर्फ नेपाळी (३०), राजकुमार सेल्वन मुन्नुस्वामी उर्फ लाला आणि अर्जुन मुनियान मुत्तू उर्फ डाकू (३७) यांचा समावेश आहे.
माथाडी युनियनच्या नावाने ‘प्रोटेक्शन मनी’
पोलिसांच्या तपासात या आरोपींनी माथाडी कामगार टोळीच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी संघटित टोळी स्थापन केल्याचे निष्पन्न झाले. या टोळीचा प्रमुख कन्नन चिन्नादुराई वन्नियार उर्फ बडा कन्ना असल्याचे तपासात समोर आले.
टोळीतील सदस्य हिंसा, जबरदस्ती, दहशत आणि धमक्यांचा वापर करून उद्योग, बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून माथाडी कामगार युनियनच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचा आरोप आहे. कंपन्यांची वाहने अडवणे, तलवार, चाकू यांसारख्या हत्यारांचा वापर करून मारहाण करणे आणि जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, अशी या टोळीची कार्यपद्धती असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या कारवायांमुळे परिसरातील व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. टोळीच्या संघटित स्वरूपातील गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी मिळाल्यानंतर या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यातील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) वाढविण्यात आली.
ही कारवाई मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोजकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पश्चिम परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे आणि अंधेरी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक मनोजकुमार माने यांच्यासह पोलिस पथकाने तपास करून कारवाई केली.