

मुंबई : एकीकडे व्याख्याने, ओपीडी, विविध वैद्यकीय प्रक्रिया आणि गंभीर रुग्णांची आपत्कालीन सेवा, तर दुसरीकडे अपुरे मनुष्यबळ, अशा दुहेरी कात्रीत मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचा हृदयरोग विभाग सापडला आहे. रुग्णसेवेचा वाढता भार लक्षात घेऊन नियुक्त करण्यात आलेल्या १९ साहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सर्वाधिक सात पदे हृदयरोगचिकित्साशास्त्र विभागाची असल्याने कार्डिओलॉजी विभागाच्या रुग्णसेवेवर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.जे. जे. रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागात दररोज सुमारे ४०० ते ५०० रुग्ण उपचारासाठी येतात.
वर्षभरात २० ते २५ हजार ओपीडी रुग्णांवर उपचार केले जातात, तर जवळपास सहा हजार विविध वैद्यकीय प्रक्रिया पार पडतात. याशिवाय अतिदक्षता विभाग, वॉर्ड, आपत्कालीन सेवा, रेफरल रुग्ण, ईसीजी, इको यांसह विविध हृदयरोगविषयक सेवा विभागाकडून दिल्या जातात.
अशा परिस्थितीत सात साहाय्यक प्राध्यापकांची सेवा संपुष्टात आल्यास विभागात केवळ चार प्राध्यापक उरणार आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
मनुष्यबळ कमी झाल्यास ओपीडीतील रुग्णांची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे. तसेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, डिव्हाइस क्लोजर यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अतिदक्षता विभागातील तसेच आपत्कालीन स्थितीतील हृदयरुग्णांना वेळेत तज्ज्ञ उपचार देणेही आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयांकडे पाठविण्याचे प्रमाण वाढल्यास इतर शासकीय व पालिका रुग्णालयांवरही अतिरिक्त रुग्णभार पडण्याची शक्यता आहे.
रुग्णालयातील इतर विभागांनाही फटका
रद्द करण्यात आलेल्या १९ नियुक्त्यांमध्ये हृदयरोग विभागातील सात पदांव्यतिरिक्त शल्यचिकित्साशास्त्र आणि नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागातील प्रत्येकी दोन पदांचा समावेश आहे. तसेच अस्थिव्यंगोपचार, बालरोग, कान-नाक-घसा, क्ष-किरणशास्त्र, उरशल्यचिकित्सा, मज्जातंतूशल्यचिकित्सा, मूत्रशल्यचिकित्सा व विकृतीशास्त्र/ मनोविकृतीशास्त्र या विभागांतील प्रत्येकी एक नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांची मागणी प्रलंबित
कार्डिओलॉजी विभागातील वाढता रुग्णभार लक्षात घेता वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, ही पदे मंजूर न झाल्याने स्थानिक पातळीवर रुग्णसेवेची गरज लक्षात घेऊन साहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या नियुक्त्याच रद्द झाल्याने रुग्णभार आणि उपलब्ध मनुष्यबळातील तफावत आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.