

कांदिवली (मुंबई) : गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील महानगरपालिकेच्या अनेक मराठी, हिंदी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी शिक्षण विभागाकडून दिल्या जात आहेत. आता मालाड पूर्वेतील शांताराम तलाव कुरार पोलीस चौकीच्या बाजूला असलेली मराठी शाळा क्रमांक १ ही सेंट फ्रान्सिस इंग्रजी शाळेला चालविण्यासाठी देण्यात आली आहे.
संस्था आणि मंडळांनी कुरार व्हिलेजची ही शाळा क्रमांक १ गेल्या एक-दोन वर्षांपासून बंद असल्याने या विभागातील जागरूक नागरिक, महापालिका पी/उत्तर विभागात पत्रव्यवहार करून या शाळेत इंग्रजी माध्यम सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ही तीन मजली शाळा खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. या परिसरातील गोरगरीब गरजू मुले इंग्रजी शाळेत शिकू इच्छितात, परंतु शाळेची फी भरू शकत नसल्याने अशा मुलांचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
गेल्या दोन ते तीन दशकांपासून या मराठी शाळेत विभागातील गरीब गरजू मुलांनी शिक्षण घेतले आहे. परंतु काही वर्षांत ही मराठी शाळा बंद झाल्याने येथे इंग्रजी शाळा सुरू करण्याची मागणी आम्ही केली होती. या शाळेचे झालेले खासगीकरण रद्द करण्यात यावे आणि सरकारकडून या शाळेत इंग्रजी शाळा सुरू करण्याची मागणी आम्ही करत आहोत. जेणेकरून या विभागातील गोरगरीब गरजू मुले इंग्रजी शिक्षण घेऊ शकतील.
नम्रता अविनाश शिंदे, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या
गेल्याच आठवड्यात माहिममधील न्यू माहिम स्कूलच्या स्ट्रक्चरल ऑडिटविरोधात जोरदार आंदोलन झाले. या आंदोलनातही मराठी शाळा बंद पाडण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने करण्यात आला होता. तसेच मुंबईतील मराठी शाळांचे केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये झालेले रुपांतर तत्काळ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती.