

मुंबई : हेगडेवार उद्यान, अमर महलपासून ट्रॉम्बे निम्नस्तर व उच्चस्तर जलाशयापर्यंत जलबोगदा बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत या बोगद्यातून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे चेंबूर, गोवंडी परिसर पाणीटंचाईमुक्त होणार आहे.
मुंबई शहरातील पाणी गळती व चोरी थांबवण्यासह मुंबईकरांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने भूमिगत जलबोगदे बांधण्यावर भर दिला आहे. त्याशिवाय जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. अमर महलपासून ट्रॉम्बेपर्यंत सुमारे 5.50 किमी लांबीचा जलबोगदा बांधण्यात आला असून या बोगद्याचे खोदकाम व अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
सध्या भूस्तरावरील जलवाहिन्या टाकण्याचे काम व अन्य आवश्यक कामे सुरू असून रिकामी येत्या काही दिवसात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मार्च 2026 अखेरपर्यंत जल बोगद्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
या जलबोगद्यामुळे चेंबूर परिसरासह गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी व आजूबाजूच्या परिसरात जाणवणारीपाणीटंचाई दूर होणार आहे. बोगद्यामुळे जलाशयाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे जलाशय वेळेत पाण्याने भरून संपूर्ण परिसरात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे या भागात गेल्या काही वर्षापासून कमी दाबामुळे होणारी सुमारे 20 ते 25 टक्के पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अमरमहल ते प्रतीक्षा नगर वडाळा आणि पुढे सदानंद ढवण उद्यान परेलपर्यंत 9.7 किमी लांबीचा जल बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या खननासह अस्तरीकरण अमरमल प्रतीक्षा नगर व परळ येथे जलवाहिनी टाकणे व अन्य कामे करण्यात येणार आहेत. या बोगद्यामुळे गोवंडी, चेबूरसह माटुंगा, सायन, अँटॉप हिल, परळ, नायगाव, वडाळा, भायखळा, कुर्ला आदी भागातील पाणीपुरवठ्यातही सुधारणा होणार आहे.