Maratha Reservation : 1881 च्या हैदराबाद गॅझेटिअरमध्ये सोळा लाख कुणबी अन् चार लाखच मराठे !
ठळक मुद्दे
हैदराबाद संस्थानच्या गॅझेटिअरच्या आधारे घटलेल्या कुणबी नोंदी पूर्ववत होण्याची शक्यता
1881 साली केलेल्या जनगणनेमध्ये तब्बल 16 लाख कुणबी तर 4 लाख मराठा समाजाच्या नोंदी
घटलेली कुणब्यांची संख्या म्हणजे मराठा समाज आहे, असा दावा करण्यात येत आहे
In the census conducted in 1881, there were as many as 16 lakh Kunbis and 4 lakh Marathas registered
मुंबई : दिलीप सपाटे
निजामाच्या हैद्राबाद संस्थानाने 1881 साली केलेल्या जनगणनेमध्ये तब्बल 16 लाख कुणबी तर 4 लाख मराठा समाजाच्या नोंदी आढळून आल्या होत्या. या नोंदी बहुसंख्य मराठवाड्यातील होत्या. मात्र, पुढील काळात लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढूनही मराठवाड्यातील कुणब्यांची संख्या घटली. आता या हैदराबाद संस्थानच्या गॅझेटिअरच्या आधारे घटलेल्या कुणबी नोंदी पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
निजामाने 1850 सालापासून आपल्या राज्याच्या जनगणनेचे काम सुरू केले. तब्बल 31 वर्षानंतर त्याचे रेकॉर्ड 1881 च्या गॅझेटिअरमध्ये प्रसिद्ध केले गेले. त्यामध्ये एकूण 17 जिल्ह्यांची जनगणना करण्यात आली होती. त्यामध्ये मराठवाडाही होता. या 17 जिल्ह्यांची एकूण लोकसंख्या ही त्यावेळी 98 लाख 45 हजार एवढी नोंदविली गेली. त्यामध्ये कुणब्यांची संख्या ही 16 लाख होती. तर मराठ्यांची संख्या फक्त 4 लाख होती.
त्यावेळी बहुसंख्य असलेली मराठवाड्यातील कुणब्यांची संख्या पुढील काळात घटली आणि मराठा नोंदी वाढल्या. ही घटलेली कुणब्यांची संख्या म्हणजे मराठा समाज आहे, असा दावा करण्यात येत आहे. त्यावर आंदोलकांमध्ये एकमत होते. राज्य सरकारने जीआर काढून त्यावर शिक्कामोर्तब केलेे.
न्या. शिंदे समितीच्या माध्यमातून 58 लाख 82 हजार नोंदी शोधण्यात आल्या असल्या तरी त्यात मराठवाड्यातील कमी आहेत. सर्वाधिक नोंदी अमरावती विभाग, त्यानंतर नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागातील आहेत. त्यांना आधीच कुणबी दाखले मिळाले आहेत. मराठवाड्यात सुमारे 50 हजार नव्या नोंदींच्या आधारे आत्तापर्यंत केवळ 2 लाख 70 हजार कुणबी दाखले देण्यात आले आहेत. त्यामुळे निजामकाळात एवढ्या मोठ्या संख्येने असलेले कुणबी पुढे मराठे झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आता हैदराबाद गॅझेटिअरच्या माध्यमातून बहुसंख्य मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने काढलेला आदेश महत्वाचा ठरणार आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील त्यांच्या शपथपत्राच्या आधारावर स्थानिक समितीच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाइकांनाही या जीआरच्या माध्यमातून दाखले मिळणार आहेत.
न्या. शिंदे समितीला सापडलेल्या कुणबी नोंदी
अमरावती विभाग 25,74,369
नागपूर विभाग 9,04,976
कोकण विभागात 8,25,247
पुणे विभाग 7,02,513
नाशिक 8,27,465
छत्रपती संभाजीनगर 47,795
लातूर विभाग 984
एकूण नोंदी - 58 लाख 82 हजार
